Mon, Sep 16, 2019 05:56होमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

काँग्रेस-राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

Published On: Feb 09 2018 2:02AM | Last Updated: Feb 09 2018 2:02AMसांगली : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने आता सर्वच पक्षांतून हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच भाजपने पुन्हा सत्तेसाठी ‘इनकमिंग’चा पेटारा खोलला आहे. त्यासाठी व्यूहरचना सुरू केली असून, काँग्रेसचे सहा तर राष्ट्रवादीचे 12 नगरसेवक सध्या भाजपच्या थेट संंपर्कात आले आहेत. यांच्या प्रवेशासाठी थेट स्थानिक नेत्यांच्या मध्यस्तीने मुख्यमंत्री व महसूलमंत्र्यांशीही चर्चेच्या बैठका झाल्याचे समजते. अर्थात प्रभागरचनेनंतर यांचा उमेदवारीसह प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे. याला काही नगरसेवकांनी दुजोराही दिला.

काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सांगली जिल्ह्यात भाजपने गेल्या टर्ममध्ये मोठी मुसंडी मारली. यामध्ये सर्वाधिक यशाचा वाटा हा थेट राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांच्या आयात आणि त्यांच्या लोकसभा, विधानसभा उमेदवारीतून भाजपला फायदा झाला आहे. हाच फॉर्म्युला त्यांनी स्थानिक पातळीवर मिनी मंत्रालय अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समिती ते नगरपालिका, ग्रामपंचायतींमध्येही अवलंबला. त्याद्वारे जिल्ह्यात भाजप पक्ष नंबर वन बनला आहे. यासाठी स्थानिक आघाड्यांचाही आधार घेतला. त्यातून मार्केट कमिटी, जिल्हा बँकेतही बस्तान बसविले आहे. 

आता महत्त्वाचे सत्ताकेंद्र महापालिका भाजपपासून दूर आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने साम-दाम-दंड वापरून महापालिका काँग्रेसच्या हातून हिरावून घ्यायची, असा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने आता खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही स्वत:च खांद्यावर जबाबदारी घेतल्याचे जाहीर केले आहे. मनपात भाजप सत्ता येताच शहरात विकासकामांचा पाऊस पाडू, अशी आश्‍वासनेही दिली आहेत.   

प्रामुख्याने जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या रसदवरच भाजपचे कमळ बहरले आहे. यामुळे राष्ट्रवादीचेच फार मोठे नुकसान झाले. जिल्हा परिषदेलाही राष्ट्रवादीचेच भाजपमध्ये ‘इनकमिंग’ जोरात झाले. परिणामी आता नेत्यांनी सावध भूमिका घेतली आहे. तरीही मनपातील राष्ट्रवादीतील दुफळीचा फायदा उठविण्यासाठी भाजपने ताकद लावली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांसह महसूल मंत्र्यांसमवेत 12 नगरसेवकांची चर्चा झाल्याचे समजते. काही नगरसेवक भाजपच्या कार्यक्रमातही दिसू लागले आहेत. यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, प्रमुख पदाधिकारीही भाजप नेत्यांच्या संपर्कात आहेत. भाजपचा मनपावर झेंडा फडकवायचाच, असा इरादाही करण्यात आला आहे. अर्थात यामध्ये प्रभागरचना आणि निवडणुकीसाठी प्रभागनिहाय निघणार्‍या आरक्षणांवर उमेदवारीचीही ‘कमिटमेंट’ ठरणार आहे. त्यादृष्टीनेही आता गुर्‍हाळ सुरू झाले आहे. यानुसार प्रभागरचना जाहीर झाल्यानंतरच प्रवेशाचा जंगी कार्यक्रम घेऊन भाजप राजकीय स्फोट घडविण्याच्या तयारीत आहे. यादृष्टीने आता हालचाली गतिमान झाल्या आहेत.

प्रसंगी आघाडीच्याही ऑफर्स...!

भाजपकडून थेट भाजप प्रवेशासाठी जोर लावण्यात आला तरी जुन्या भाजप कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांकडून मात्र याला विरोधही होऊ लागला आहे. यामध्ये मिरजेत मोठी आघाडी आहे. सांगलीतही असे अनेक वाद चर्चेत आहेत. काहीजणांना पुन्हा पक्षात घेण्यास विरोधही होत असल्याची चर्चा आहे. पण हे वाद सत्तेला अडचणीचे ठरू शकतात. त्यावर पर्याय म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीशी नाळ न जुळणार्‍यांनी ‘आघाडी’ कायम ठेवून सत्तेला हातभार लावावा, अशाही चर्चा सुरू आहेत. 

ते नगरसेवक थेट चर्चेत...!

राष्ट्रवादी-काँग्रेसने भाजपला थोपविण्यासाठी निवडणुकीसाठी आघाडीचा झेंडा फडकवण्यास सुरुवात केली आहे. निर्णय अद्याप झाला नसला तरी तसे नेत्यांकडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत भाजपसमोर निवडणुकीत ताकद एकवटल्याने मोठे आव्हान ठाकणार आहे. यावर उपाय म्हणून भाजपने निवडणुकीच्या तोंडावर इनकमिंगसाठी आश्‍वासनांचा ‘पेटारा’ खोलला आहे. यामध्ये आता काँग्रेसचे मिरजेतील तीन आणि सांगलीतील तीन नगरसेवक थेट चर्चेत आले आहेत.