होमपेज › Sangli › इस्लामपूरमध्ये विरोधी उमेदवारीवरून संभ्रम !

इस्लामपूरमध्ये विरोधी उमेदवारीवरून संभ्रम !

Published On: Jul 18 2019 1:55AM | Last Updated: Jul 17 2019 8:58PM
इस्लामपूर : अशोक शिंदे

इस्लामपूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात विरोधी विकास आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत. यंदा संघटित ताकदीवर ‘परिवर्तन’ करायचेच; हा विरोधकांचा नारा आहे. मात्र, त्याचवेळी उमेदवार कोण असे विचारले, की  संभ्रमाचा बार उडत आहे.

गेल्या पंधरवड्यात मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पंचायत समितीतील गटनेते राहुल महाडिक, भाजपचे विक्रम  पाटील, हुतात्मा समुहाचे गौरव नायकवडी, शिवसेनेचे  नेते आनंदराव पवार आदी प्रमुख विरोधकांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्या भेटीचा फार तपशील बाहेर आला नसला तरी विधानसभा निवडणुकीसाठी  ही सारी मंडळी एकत्र असल्याचे अधोरेखित झाले. त्यानंतर काही दिवस उलटताच तोवर इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत  पाटील यांच्या वाढदिवसाची शेकडो डिजिटल इस्लामपूर शहरासह तालुक्यात झळकली.त्यावर मजकूर आला ‘अब की बार, दादा आमदार!’. यानंतर  तालुक्यातील सार्‍या जयंतराव विरोधकांमध्ये विरोधकांच्या उमेदवारीची चर्चा लगबगीने सुरू झाली.

 खोत यांच्यासह तालुक्यातील सर्व विरोधकांनी फक्‍त नगराध्यक्ष पाटील यांना वगळून बैठक घेत भूमिका सांगितली.  त्यामध्ये उमेदवारी घोषित करण्याची कोणी घाई करू नये. मीच उमेदवार, असा संभ्रम कोणी निर्माण केला तर आम्ही तो प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही, असा सज्जड दम अप्रत्यक्षपणे नगराध्यक्ष पाटील यांनाच  त्या सगळ्यांनी दिला.

नगराध्यक्ष  पाटील  यांचा वाढदिवस... त्यात  तालुकाभर डिजिटल...शक्‍ती प्रदर्शन यामुळे लगबगीने भीमराव माने  यांची ‘विकास आघाडी’चे समन्वयक म्हणून निवड झाली. या आघाडीने स्पष्ट केले की, राष्ट्रवादीच्या विरोधात मोठी फळी तयार होत आहे. त्यामुळे लढणार्‍या इच्छुक उमेदवारांची फौज तयार झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष उमेदवारीवेळी आघाडीत सलोखा  राहणार का, हा प्रश्‍न आहे.

 आधीच हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यात निशिकांत पाटील यांच्या  भूमिकेला ब्रेक लावणारे अनेक आक्रमक विरोधक,राज्यमंत्री खोत यांनीही स्पष्ट केलेला उमेदवारीचा इरादा, यापासून बाजूला असलेले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जितेंद्र पाटील; अशा अनेक भेगा आत्तापासून विरोधकांच्या ऐक्यात पडताना दिसत आहेत. 

एकीतूनच राष्ट्रवादीला सुरूंग

वास्तविक या परिसरात तत्कालीन नेते नानासाहेब महाडिक यांनी स्वाभिमानाने विरोधकांची ताकद तन, मन, धनाने एकसंघ ठेवली होती. ते  वास्तव कोणीही नाकारणार नाही. इस्लामपूर पालिकेत सत्तांतर होताना सदाभाऊ खोत यांचे नेतृत्व विरोधकांना  खूपच तारणारे ठरले. महाडिक गट, भाजप, शिवसेना, रयत क्रांती, काँगे्रस, हुतात्मा गट अशा अनेक गटांची पालिका निवडणुकीच्यावेळी झालेली एकी राष्ट्रवादीला सुरूंग लावणारी ठरली.