होमपेज › Sangli › दादाप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये शीतयुध्द

दादाप्रेमी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यावरून काँग्रेसमध्ये शीतयुध्द

Published On: Mar 26 2019 8:01PM | Last Updated: Mar 26 2019 7:49PM
सांगली : प्रतिनिधी

दादाप्रेमी कार्यकर्त्यांचा झालेला मेळावा अनधिकृत असल्याची तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे काँग्रेसमधील एका गटाने केली आहे. तर मेळाव्याला उपस्थित असलेल्या प्रमुख नेत्यांनी यात काहीच गैर नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सांगली लोकसभा उमेदवारीबाबत निर्माण झालेला वाद आणखीन चिघळू लागला आहे. 

स्वाभिमानीला जागा गेल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी याला तीव्र विरोध केला आहे. काही कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला कुलूप घालून याचा निषेध केला. दादा व कदम गटाने एकमेकाविरोधात जोरदार आरोप-प्रत्यारोप केले. काही नेत्यांनी केंद्र व राज्य पातळीवर तक्रार केली. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातवरण चांगलेच ढवळून निघाले आहे. त्यातच वसंतदादा गटाने मेळावा घेवून पक्षाने उमेदवारी न दिल्यास बंडखोरीचा इशारा दिला आहे. तसेच माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी राजीनामा दिला आहे. आता या मेळाव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या एका गटाने हा मेळावा अनधिकृत असल्याचा आरोप केला आहे. मेळावा एका गटाचा असताना सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित का राहिले? अशा आशयाची तक्रार प्रदेशस्तरावरील नेत्यांकडे केली आहे.  

मेळाव्याला उपस्थित नेत्यांनी यात काहीच गैर नसल्याचे सांगितले आहे. वसंतदादा म्हणजे काँग्रेस असे समीकरण सांगलीत आहे. तसेच पश्‍चिम महाराष्ट्राचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीची जागा पक्षश्रेष्ठींकडे मागणे यात चुकीचे काहीच नाही, असे मेळाव्यास उपस्थित पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. 

अगोदरच उमेदवारीबाबतची तक्रार पक्षश्रेष्ठीकडे झाली होती. त्यात पुन्हा मेळाव्यावरुन तक्रार झाली आहे. सततच्या वादामुळे पक्षाचे वरिष्ठ नेते वैतागले आहेत. पक्षातंर्गत वाद अगदीच विकोपाला गेल्यामुळे प्रदेश कार्यकारिणी नाराज झाली आहे.