Sat, Jul 11, 2020 14:42होमपेज › Sangli › नमस्कार-चमत्कार थांबले, रात्रीचा खेळ सुरू!

नमस्कार-चमत्कार थांबले, रात्रीचा खेळ सुरू!

Published On: Apr 21 2019 1:42AM | Last Updated: Apr 20 2019 11:11PM
सांगली : संजय खंबाळे

लोकसभा  निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदानासाठी अवघे 48 तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून नमस्कार - चमत्कार करीत होणारा प्रचार आता थांबणार आहे. आता गनिमी काव्याने रात्रीच्या वेळी प्रचाराला प्रारंभ होणार आहे. 

सांगली व हातकणंगले दोन्ही मतदारसंघात यावेळी मोठी चुरस निर्माण झाली आहे. भल्या - भल्या राजकीय विश्‍लेषक व जाणकारांना या निवडणुकीच्या निकालाबाबत अंदाज लावणे मुश्किल होऊन बसले आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. पूर्वीच्या निवडणुका या वैचारिक, पक्षनिष्ठा आणि तत्त्वनिष्ठ  याच्या चाकोरीतून होत असत. आता त्या गोष्टी इतिहास जमा झाल्या आहेत. 

ज्या दिवशी मतदान आहे. त्या दिवसाच्या एक दिवस आधी प्रचार यंत्रणा थांबविण्याचा नियम आहे. सभा, गाठीभेटी, पदयात्रा यांना पूर्णत: बंदी असते. पण त्याच दोन दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी बर्‍याच उलथापालथी होत असतात. 

नागरिकांची मते आपल्या पारड्यात पडावी म्हणून अनेक प्रकारच्या खटपटी केल्या जातात. काही उमेदवार भावनिक आवाहन करुन मन परिवर्तन करून आपल्या बाजूने मते कशी मिळतील, यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न करीत असतात.

आजपर्यंतचा इतिहास पाहता मतदानाच्या आदल्या दिवसाला खूप महत्त्व असते. या दिवशी राजकीय क्षेत्रात बर्‍याच नाट्यमय घडामोडी वेगाने घडतात. जे गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून ज्याचा जीव ओतून प्रचार करीत असतात त्यातील काहीजण आदल्यादिवशी दुसर्‍यांचाच प्रचार करताना दिसतात. यालाच तर राजकारण म्हणतात. 

एका रात्रीत एकगठ्ठा मते मिळवण्यासाठी गावागावांत प्रत्येक पक्षांकडून एक विशिष्ट टीम तयार करण्यात येत असते. त्यांच्याकडे मनपरिवर्तनाचे काम सोपविलेले असते. तरीही,  काळोख्या रात्रीत ही टीम गनिमीकाव्याने नागरिकांपर्यंत पोहोचून भेटीगाठी घेत असते.आपल्या बाजूने  मत  मिळवण्यासाठी आश्‍वासनांचा  पाऊस पाडला जातो. 

कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे रुसवे - फुगवे, नेत्यांकडून   मनधरणी, देवाण-घेवाण, फोडाफोडीचे राजकारण, आपल्या कार्यकर्त्याला विरोधी पक्षात पाठवून अंदाज घेण्याचा प्रकार या दोन दिवसांमध्ये जोरात सुरू असतो. म्हणून अनेकांसाठी ही रात्र  वैर्‍यांची ठरू शकते. 

याच दोन दिवसांमध्ये नेत्यांना कार्यकर्त्यांकडून दगाफटका होण्याची दाट शक्यता असते. जे गेल्या  पंधरा दिवसांत  झाले नाही, ते या  दिवसांत  होत असल्याने नेतेमंडळी कार्यकर्त्यांवर बारकाईने लक्ष  ठेवतात. त्याचवेळी  प्रशासनही सर्व प्रकारचे गैरप्रकार रोखण्यास सज्ज असते. या सार्‍या निवडणुकीच्या रणधुमाळीत आता शेवटच्या दोन दिवसांना आणि या दोन दिवसांत होणार्‍या घडामोडींना चांगलेच महत्त्व येणार आहे. 

निकालावरून पैजा ...   

अजून निवडणूक व्हायची आहे. ती झाल्यानंतर जवळपास एका महिन्यानंतर निकाल लागणार आहे. पण त्या अगोदरच अनेक कट्ट्यांवर, चौकात निकालावरून पैजा लागल्या आहेत. कोणाला किती मते पडणार, कोणाचे डिपॉझिट जप्त होणार, कोण किती 
फ रकाने निवडून येणार, अशा पैजा मित्रांमध्ये लागल्या आहेत.