Wed, Jul 15, 2020 17:43होमपेज › Sangli › सांगली स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर सफाई

सांगली स्वच्छ करण्यासाठी युद्धपातळीवर सफाई

Published On: Aug 13 2019 9:46AM | Last Updated: Aug 13 2019 9:45AM

संग्रहित छायाचित्र  सांगली : प्रतिनिधी

महापूर ओसरलेल्या भागात आता  घाणीचे साम्राज्य आहे.  प्रदूषणामुळे साथीचा धोका आहे. त्यामुळे महापालिकेने युद्धपातळीवर मास्टरप्लॅन राबवून सफाईमोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत राज्यभरातून विविध नगरपालिका, महापालिका, सामाजिक संघटनांचा राबता सुरू झाला आहे. याअंतर्गत शहरातील अनेक भागात कचरा उठाव, सफाई, रस्ते धुलाई आणि औषधफवारणी सुरू होती. यातून तीनशे टनांहून अधिक कचरा हटविण्यात आला. सुमारे पाच दिवस ही मोहीम सुरू राहणार आहे. 

गेल्या आठ दिवसांहून अधिक काळ शहरातील मुख्य वस्त्या, बाजारपेठांसह अर्धी सांगली पाण्यात होती. गेल्या दोन दिवसांत महापूर ओसरू लागल्यानंतर आता हळूहळू मुख्य वस्त्या पाण्यातून बाहेर आल्या. परंतु महापुरासोबत आलेली गटारगंगा, मृत जनावरांसह विविध प्रकारच्या घाणीमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे रोगाचा मोठा धोका आहे. 

हा धोका टाळण्यासाठीआयुक्‍त नितीन कापडनीस, उपायुक्त राजेंद्र तेली, स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाने स्वच्छतामोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता. शासनाकडूनही गंभीर दखल घेण्यात आली होती. त्यासाठी राज्यभरातील अनेक महापालिका, नगरपालिका, सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन केले होते. त्यामुळे कालपासूनच यंत्रणेसह ठिकठिकाणांहून फौजफाटा दाखल झाला होता. 

यामध्ये बृहन्मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, लातूर महापालिका आणि जेजुरी, इस्लामपूर, आष्टा, विटा, पंढरपूर, करमाळा आदींसह विविध नगरपालिकांनी सांगलीच्या मदतीला यंत्रणा व कर्मचारी पाठविले आहेत. कॉन्ट्रॅक्टर असोसिएशननेही कंटेनर, जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर उतरून सफाईसाठी राबता सुरू ठेवला  आहे.

विटा व तासगावच्या मुख्याधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पूर ओसरलेल्या भागासाठी स्वच्छता मोहीम राबविली.  यामध्ये हिराभाग चौक,  केसरी गल्ली, खणभाग, सत्य विजय चौक , स्टेशन चौक, आमराई ते चेंबर्स ऑफ कॉमर्स चौक  आदी भागात सर्व कचरा हटविला. वॉर्ड क्र. 12 , 18   गोकुळनगर , रेपे प्लॉट आदी भागातही सफाई मोहीम राबवली.  संपूर्ण परिसरात औषध फवारणी करण्यात आली. मिरज येथील  वॉर्ड क्र 5 ,6 , दर्गा भाग, कृष्णा घाट परिसर  , भीम वसाहत इत्यादी ठिकाणी स्वच्छता तसेच औषध फवारणी करण्यात आली. 

नागरिकांनीही घरांची सफाई केल्यानंतर धान्य, खाद्यपदार्थ, भिजलेल्या गाद्या, विविध जीवनोपयोगी खराब वस्तूंसह मोठ्या प्रमाणात कचरा कंटेनरसह जागोजागी टाकला होता. तोही जेसीबीने हटविण्यात आला.

मराठा उद्योजक लॉबीसह अनेक संघटना पुढे

महापुरानंतर रोगराईचा धोका असतो. त्यामुळे खबरदारीसाठी शासकीय यंत्रणा राबत असली तरी विविध संघटनांनीही पुढाकार घेतला. यामध्ये मराठा उद्योजक लॉबीने पुढाकार घेतला. या संघटनेचे जिल्हाभरातील उद्योजक सांगली यंत्रणेसह राबले. सागर पाटील, संदीप पाटील, विजय पाटील, अभिजित पाटील, विजय चव्हाण, राहुल गायकवाड, अक्षय साळुंखे, संजय पाटील, मयुरी मगदूम आदिंसह 65 जणांनी हातात झाडू घेऊन सफाई केली. तसेच औषधफवारणीसाठीही स्व:खर्चाने यंत्रणा राबविली. सलग पाच दिवस ही टीम राबणार आहे. संत निरंकारी मंडळ, विविध सामजिक संघटनांचाही राबता सुरू होता.