सांगली : प्रतिनिधी
फुकट मावा न दिल्याने दोन गटांत चाकू आणि लोखंडी सळ्यांचा वापर करत जोरदार राडा झाला. दोन्ही गटांतील चारजण जखमी झाले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. येथील माधवनगर रस्त्यावरील बायपास रोड चौकात भर दुपारी तीनच्या दरम्यान हा प्रकार घडला.
रोहित जगन्नाथ आवळे (वय 24), तुकाराम सुभाष मोटे (वय 30), विज्ञान सूर्यकांत आलदर (वय 24)आणि विनायक श्रीकांत आलदर (वय 32, रा. सर्व पंचशीलनगर) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आवळे आणि मोटे यांच्या विरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. त्या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. सुशांत शिवाजी सलगर याचे माधवनगर बायपास रस्त्यावर पान दुकान आहे. त्या ठिकाणी दुपारी तीनच्या सुमारास तुकाराम मोटे आणि रोहित आवळे आले. त्यांनी मावा घेतला. सुशांतने त्याचे पैसे मागितले. त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
सुशांतने त्याचे नातेवाईक विज्ञान आणि विनायक यांना बोलावून घेतले. त्यानंतर वाद वाढत गेला. शिवीगाळ आणि मारामारी सुरू झाली. आवळे आणि मोटे यांच्यावर चाकूने हल्ला झाला आणि आलदर बंधूंना सळीने मारहाण झाली. हा प्रकार सुरू असतानाच तेथून सांगली शहर पोलिस ठाण्यातील पोलिस बी. डी. चव्हाण चालले होते. त्यांनी प्रसंगावधानाने मारामारी थांबवली. आणखी पोलिसांना तातडीने बोलावून घेतले. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र काही हल्लेखोर पळून गेले. रोहित आवळे याचेही पंचशीलनगर येथे पान दुकान आहे. तो आणि मोटे यांच्या विरोधात संजयनगर पोलिस ठाण्यात मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. सांगली शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पोलिसामुळे मोठा अनर्थ टळला
जिल्ह्यात खुनी हल्ल्यांचे सत्र सुरूच आहे. गुंडांच्या टोळ्यांची दहशत वाढते आहे. एकामागे एक खून होत आहेत. त्यात आज आणखी एका खुनी हल्ल्याची भर पडली. शेकडो लोक वाहने थांबवून हा प्रकार बघत होते. मात्र कुणीही मारामारी थांबवण्याचा प्रय्त्न केला नाही. पोलिस चव्हाण यांनी मात्र मारामारी रोखल्याने मोठा अनर्थ टळला.