Wed, Jul 15, 2020 16:46होमपेज › Sangli › नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला : पृथ्वीराज देशमुख

नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला : पृथ्वीराज देशमुख

Published On: Aug 04 2018 1:36AM | Last Updated: Aug 03 2018 11:23PMसांगली : प्रतिनिधी 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत या तीनही शहरांतील नागरिकांनी भाजपवर विश्वास दाखवला आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि आमदार सुरेश खाडे यांच्या आणि राज्यशासनाच्या माध्यमातून  त्यांचा विश्वास सार्थ ठरवण्याचा  आटोकाट प्रयत्न आम्ही करू, अशी ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली.

ते म्हणाले, आम्हाला विजयाचा आत्मविश्वास होता. वास्तविक आमच्या अंदाजापेक्षा दोन-तीन जागा कमीच आल्या. आम्ही पंचेचाळीस जागांची तयारी आणि अपेक्षा ठेवली होती. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आमच्या पक्षावर आणि सरकारवर वाटेल ती टीका केली. वाटेल तसे आरोप केले. मात्र आम्ही त्यांच्या असल्या प्रचाराला उत्तरे देत बसलो नाही. आम्ही थेट नागरिकांशी संवाद साधला.  अत्यंत संयमाने प्रचार केला. त्यांच्या रोजच्या जीवनातल्या समस्या समजावून घेतल्या. त्या महापालिकेमार्फत सोडवण्याची हमी दिली. त्यामुळे विरोधकांच्या  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रचाराला नागरिकांनी थारा दिला नाही.

देशमुख म्हणाले, या विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यातील भाजपचे अभिनंदन केले आहे. या महापालिका क्षेत्राच्या विकासासाठी जे-जे शक्य आहे, ते-ते करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली आहे.