होमपेज › Sangli › तहसीलदारांकडून वाळू चोरट्याला चोप

तहसीलदारांकडून वाळू चोरट्याला चोप

Published On: Jun 01 2019 2:03AM | Last Updated: Jun 01 2019 2:03AM
तासगाव : शहर प्रतिनिधी

बेकायदा वाळू चोरीप्रकरणी ताब्यात घेतलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून जबरदस्तीने पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. या  वाळू चोरट्याला तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वाटेत अडवून चांगलाच चोप दिला. एखाद्या  चित्रपटात शोभेल असा  प्रकार तासगावमध्ये  शुक्रवारी सायंकाळी झाला. मणेराजुरी येथील मंडल अधिकार्‍यांनी शुक्रवारी सकाळी शिरोळ तालुक्यातील अजित शिवाजी जाधव यांचा ट्रक (एमएच 10 झेड 1148)  वाळू चोरी करीत असताना ताब्यात घेतला होता. तो तहसील कार्यालयाच्या आवारात लावला होता. 

तहसीलदार ढवळे मिरज प्रांत कार्यालयामधील बैठक संपवून  तासगावमध्ये आल्या. कार्यालयाकडे जात  असताना समोरून जप्त केलेला ट्रक येताना त्यांना दिसला.  ढवळे यांनी  त्या ट्रकचा पाठलाग     
सुरू केला.  ट्रकचा मालक जाधव  कारमध्ये होता. तो तहसीलदारांना अडवण्याचा प्रयत्न करीत होता.  तरीही तहसीलदारांच्या वाहनचालकाने  त्यांचे वाहन समोर नेऊन ट्रक अडवला.   तहसीलदार ढवळे यांनी  ट्रकचालकाला ट्रकमधून खाली ओढून चोप देण्यास सुरूवात केली. यावेळी बघ्यांची गर्दी झाली होती. ट्रकमालक अजित जाधव याच्यासह त्याची कारही पोलिसांनी त्वरित घटनास्थळी येऊन ताब्यात घेतली. 

तर काळ सोकावला असता : ढवळे

मला येण्यास वेळ झाला असता तर ट्रक पळवून नेल्याबद्दल पोलिस ठाण्यात तक्रार नोंद झाली असती. तपास सुरू झाला असता. मात्र अन्य वाळूचोरट्यांनी असाच प्रकार केला असता.  काळ सोकावला असता. त्यामुळे  कोणताही विचार न करता केवळ तो ट्रक अडवायचा एवढेच मी ठरवले  होते, असे तहसीलदार कल्पना ढवळे यांनी सांगितले.