Connection Error निवडणुकीचे बदलले रंग अन् ढंगही ! | पुढारी 
Sun, Jul 12, 2020 19:07होमपेज › Sangli › निवडणुकीचे बदलले रंग अन् ढंगही !

निवडणुकीचे बदलले रंग अन् ढंगही !

Published On: Apr 09 2019 1:59AM | Last Updated: Apr 08 2019 8:59PM
सांगली : गणेश कांबळे

निवडणुकीचा एक काळ होता... रिक्षांवरचा मोठा लाऊड स्पीकर उमेदवारांचा प्रचार करत असायचा, नाव व चिन्हे पोहोचविण्यासाठी रात्रभर भिंती रंगवल्या जायच्या.. कार्यकर्ते चिरमुरे अन् वडापाववर प्रचाराला तयार व्हायचे. आज वॉररुममध्ये बसून एका ‘क्‍लिक’ वर लाखो मतदारांपर्यंत घोषणा, भाषणे, चित्रे पोहचविता येतात. त्यामुळे बदलत्या परिस्थितीत निवडणुका या ‘इव्हेंट’ बनल्या आहेत. या सार्‍याच बदलाचा आढावा तितकाच उत्कंठापूर्ण ठरावा.!

दशकाचा काळ अन् त्यानंतर झालेल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमात झालेल्या बदलामुळे निवडणुकीची पद्धतीच बदलून गेली. आज जसे एका क्‍लिकवर लाखो अनुयायांपर्यंत संदेश पोहचविण्याची सुविधा निर्माण झालेली आहे, तशी ती पूर्वी नव्हती. एकेक कार्यकर्ता जमविण्यासाठी उमेदवाराला संपूर्ण जिल्हात पायपीट करावी लागत असे. बोलका अन् भाषणात तरबेज असणार्‍या एका कार्यकर्त्याला रिक्षात बसवून ‘ताई-माई, आक्का, विचार करा पक्का अन् .... वर मारा शिक्का’ अशा घोषणा माईकवर देत कोसो दूर फिरावे लागत असे. गावागावातील चौकाचौकात रिक्षा थांबवून माईकवर ओरडून गर्दी जमवावी लागत होती. त्याचवेळी नेत्यांची होणारी सभा, ठिकाण, वेळा यांचा सतत मारा करावा लागत असे. त्यानंतर प्रचार सुरू व्हायचा. 

डिजिटल व्हॅन आली; पोस्टर, बॅनर्स, होर्डिंग झाले गायब 

निवडणूक सुरू झाली की, पक्षाच्या कार्यालयात एकच धामधूम असायची. उमेदवारांचे मोठे छायाचित्र असलेले पोस्टर छापून घेतली जायची. रात्रीच्यावेळेला प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात पोस्टरचा गठ्ठा आणि खळ भरलेला डबा  दिला जात असे. कार्यकर्तेही उत्साहाने प्रत्येक प्रभागात आनंदाने पोस्टर्स लावत असे. काही ठिकाणी कापडी होर्डिंग्ज लावण्यात येत असत. उमेदवाराचे चित्र, पक्ष आणि चिन्ह असलेले होर्डिंग लाकडाला अडकवून ती ठिकठिकाणी लावण्यात येत होती. एकाच चौकात अनेक उमेदवारांचे बॅनर्स असायचे. परंतु या पद्धती आता गायब झालेल्या आहेत. त्याऐवजी डिजिटल व्हॅन ही चौकाचौकात फिरताना दिसते. देशपातळीवरील नेत्यांची भाषणे ही स्क्रीनवर दाखविण्याची पद्धत सुरू झाली. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी ही व्हॅन फिरवता येते. डिजिटल क्रांतीमुळे पोस्टर्स, रंगारी यांचे काम मात्र संपून गेले. 

शिक्का गेला अन् इव्हीएम आले

मतपत्रिकेवर शिक्का मारून ती पेटीत टाकली जायची. पेटीचे रक्षण करण्यासाठी पोलिस यंत्रणा असायची. त्यानंतर मतमोजणीदिवशी पेटीतून मतपत्रिका काढली जायची. त्याची मोजणी करून विजयी उमेदवार घोषित केला जायचा. परंतु निवडणूक यंत्रणेतील सर्वात मोठी क्रांती झाली ती इव्हीएम यंत्राची. मतपत्रिका गेली, पेटी गेली. त्याऐवजी

प्रचाराची भाषा झाली असभ्य

पूर्वी लाखोंच्या सभा व्हायच्या. अनेक दिग्गज नेते सभेसाठी यायचे. खेड्यापाड्यातून लोक चालत सभेच्या ठिकाणी जात असत. या सभेत लोकांचे प्रश्‍न, विकासाचे मुद्दे, विरोधकांचे अपयश, अपूर्ण राहिलेली कामे, त्यावरची आश्‍वासने याबाबत जोरदार चर्चा असायची. मतदान होईपर्यंत अशा मुद्यांवर गटागटात लोक बसून चर्चा करीत. परंतु सध्या हे मुद्दे बाजून पडून वैयक्‍तिक पातळीवर टीका केल्याचे दिसून येते. सांगली जिल्ह्यात काही नेत्यांनी वैयक्‍तिक पातळीवर टीका केल्याचे दिसून आले. शिवराळ भाषा, गुंडगिरी मोडून काढू अशा असभ्य भाषेमुळे लोकांचे प्रश्‍न मात्र दूर राहिल्याचे दिसून आले. 

भिंती बोलक्या व्हायच्या...

निवडणूक म्हटली की प्रचाराची रणधुमाळी असायची. त्यासाठी पूर्वी  अनेक पद्धती वापरण्यात येत होत्या. भिंती रंगवून त्या बोलक्या करणे हा प्रकार प्रसिध्द होता. प्रत्येक पक्षांची टॅगलाईन ही त्या भिंतीवर झळकायची.  मावशी आक्का, विचार करा पक्का अन् ... वर मारा शिक्का’ अशा पद्धतीने उमेदवारांचे नाव व चिन्हांनी भिंती रंगविल्या जायच्या. जुन्या मराठी चित्रपटातील दृश्यात या रंगविलेल्या भिंती पहायला मिळतात. सांगली जिल्ह्यातील काही गावांमध्ये, पुलावर हे अवशेष दिसतात.