Thu, Jul 02, 2020 11:17होमपेज › Sangli › चांदोलीतील बिबटे मोकाट उद्यानात मात्र शुकशुकाट 

चांदोलीतील बिबटे मोकाट उद्यानात मात्र शुकशुकाट 

Published On: Jan 03 2019 4:54PM | Last Updated: Jan 03 2019 3:53PM
वारणावती (सांगली) : आष्पाक अत्तार 

चांदोली उद्यानातील बिबटे आता जिल्हाभर भटकू लागले आहेत. मात्र वन तसेच वन्यजीव विभागाकडून याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने बिबटय़ांचे भटकणे जीवावर बेतू लागले आहे. त्यामुळेच चांदोलीत उद्यानात शुकशुकाट आणि जिल्हाभर मोकाट अशी बिबट्याची अवस्था होऊ लागली आहे. 

दोन वर्षांपूर्वी उद्याना बाहेर भटकणाऱ्या दोन बिबट्यांचा पणुंब्रे वारूण जवळच्या माळावर आकस्मिक मृत्यू झाला होता. तर नुकताच येडेनिपाणी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाला. यावर उद्यानाबाहेर भटकणारे बिबटे आणि त्याचे होणारे मृत्यू वन्यजीव विभागाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. मात्र सध्या तर वन व वन्यजीव हे दोन्ही विभाग  आपली जबाबदारी एकमेकांवर ढकलत असल्याची वस्तुस्थिती आहे. 

चांदोलीतील बिबटे उद्यानाबाहेर भटकू लागले आहेत ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या परिसरात वाडीवस्तीवर दररोज बिबट्याचे दर्शन होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या त्यांच्याकडून फस्त केल्या जात आहेत. भक्षाच्या शोधात हे बिबटे भटकू लागले आहेत. शांतीनगर, बिउर, गोटखिंडी, येडेनिपाणी या परिसरातही नागरिकांना बिबटय़ाचे दर्शन झाले होते. तर येळापूर जवळ तर एक बिबट्या आपल्या तीन बछड्यांसह दृष्टीस पडला होता. ग्रामस्थांनी वन विभागाकडे पिंजरा लावून या बिबटय़ांना जेरबंद करण्याची मागणी केली होती. संबंधित बिबट्या व बछडे ज्या ठिकाणी दिसले तो परिसर वनविभागाच्या हद्दीत असल्यामुळे वन्यजीव विभागाने याकडे दुर्लक्ष केले. तर दुसरीकडे वन विभागाने आमच्याकडे पिंजरा नाही .वरिष्ठ कार्यालयाकडे  पिंजऱ्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे .अशी प्रतिक्रिया दिली होती .

एकीकडे चांदोलीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाल्यानंतर वाघ व  बिबट्यांची संख्या वाढावी म्हणून वन्यजीव विभागाने त्यांचे खाद्य उद्यानातच उपलब्ध व्हावे यासाठी सागरेश्वर अभयारण्यातील काळवीट व हरणे उद्यानात सोडली होती. त्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत बिबट्यांची संख्या आता चाळीस ते पन्नासच्या घरात गेली. बिबट्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांचे खाद्य अपुरे पडू लागले आहे. त्यानंतर वन्यजीव विभागाने एकदाही उद्यानात त्यांचे खाद्य उपलब्ध करून दिले नाही. परिणामी भक्षाच्या शोधात हे बिबटे उद्यानाबाहेर पडू लागले आहेत. या बाहेर पडलेल्या बिबट्याबाबत वन्यजीव विभाग हद्दीचे कारण पुढे करून हात वर करत आहे. त्यामुळे उद्यानाबाहेर मोकाट फिरणाऱ्या बिबट्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. वन्यजीव विभागाने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज आहे अन्यथा भविष्यात उद्यानात शुकशुकाट जिल्हाभर बिबटे मोकाट अशी परिस्थिती आल्यावाचून राहणार नाही.