Sat, Jul 04, 2020 03:32होमपेज › Sangli › नव्या पोलिस निरीक्षकांसमोर अवैध धंद्यांचे आव्हान

नव्या पोलिस निरीक्षकांसमोर अवैध धंद्यांचे आव्हान

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:27PMमिरज : जालिंदर हुलवान

मिरज शहर आणि ग्रामीण भागांमध्ये मोबाईल व दुचाकी चोरांचा सुळसुळाट सुरू आहे. चार चोरटे पकडूनही दररोज कुठे ना कुठे मोबाईल व दुचाकीची चोरी होतेच. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. 
दुसरीकडे मटका आणि बनावट गुटखावालेही तेजीत आहेत. मिरज शहर व महात्मा गांधी चौकी पोलिस ठाणे या दोन नव्या पोलिस ठाण्यांत आलेल्या नव्या पोलिस निरीक्षकांसमोर अवैध धंदे वाल्यांचे आजही आव्हान आहे. या गुन्हेगारांकडे पोलिस यंत्रणेने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.  

मिरज शहर आणि ग्रामीण भाग हा कर्नाटकच्या सीमेवरील भाग आहे. त्यामुळे या भागात कर्नाटकातील गुन्हेगारांचा राबता आहे. कर्नाटकातील गुन्हेगार मिरजेत आश्रयास असतात. मिरजेतील स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने ते येथे गुन्हे करतात. हे आत्तापर्यंतच्या पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. बाजूच्या कोल्हापूर, सोलापूर व सातारा जिल्ह्यातीलही गुन्हेगार मिरजेत वास्तव्यास असतात. गेल्या काही महिन्यांचा अभ्यास केला तर मिरजेमध्ये मोबाईल चोरीचे प्रकार वाढले आहेत. शिवाय दुचाकीही चोरीस जात आहेत. शहरातील विविध भागांमध्ये दररोज दुचाकी व मोबाईलची चोरी होते आहे.शहरातील शासकीय रुग्णालय, रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसर, विविध खासगी रुग्णालये या ठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींची चोरी होत आहे. घरासमोर उभ्या केलेल्या दुचाकीही चोरीस गेल्या आहेत. 

मोपेड गाड्यांचे कुलूप लगेच तुटत नाही. बाईकचे कुलूप लगेच तुटते. त्यामुळे मोपेडपेक्षा बाईक चोरीच्या संख्या जास्त आहेत. आता तर बुलेट गाड्यांचीही चोरी वाढली आहे. दुचाकी चोरीस गेल्या की पूर्वी कच्ची नोंद घेतली जात होती. मात्र आता थेट गुन्हा दाखल केला जातो. मिरजेतील शहर पोलिस ठाणे, महात्मा गांधी चौकी या दोन पोलिस ठाण्यांमध्ये या नोंदी वाढल्या आहेत. सध्या मोबाईल चोरणे हे चोरांसाठी सोयीचे आहे. अँड्रॉईड मोबाईल हे महागडे असल्याने ते चोरी होत आहेत. या चोरट्यांनी मार्केट, आठवडा बाजार टार्गेट केले आहेत. शहरात अनेक मोबाईल चोरीस गेले आहेत. मोबाईल व दुचाकी चोरीच्या घटना वाढत आहेत; पण चोर सापडत नाहीत. या चोरांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही पोलिसांचीच आहे. गेल्या महिन्यामध्ये दुचाकी चोरणार्‍या दोन टोळ्या पोलिसांनी पकडल्या. काही दुचाकी जप्तही केल्या पण आजही दररोज दुचाकी चोरल्या जात आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीस गेल्या आहेत. 

महिलांच्या गळ्यातील सोन साखळी चोरण्याचे प्रमाणही वाढले आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरामध्ये हे गुन्हे जास्त घडत आहेत. एटीएममध्ये चोरी झाली आहे. बंद दुकान व बंद घरांची कुलुपे तोडून चोर्‍या होण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. या चोरट्यांचा पोलिसांनी बंदोबस्त करण्याची गरज आहे. काही चोरट्यांना पकडून पोलिसांनी कारवाई केली आहे. सावकारांनीही सध्या धुमाकूळ घातला आहे. काही सावकारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुटखा व माव्याचा धंदा तेजीत आहे. बनावट नोटा विकणारेही सापडू लागले आहेत. मटका सुरू आहे. मिरजेतील एका सराफाचे दुकान फोडून सुमारे पाच कोटी रुपयांचे सोने लंपास करण्यात आले होते. ही घटना सुमारे सहा वर्षांपूर्वीची आहे. मात्र अद्याप हा गुन्हा उघड झालेला नाही. शिवाय मिरजेतील प्रसिध्द अंबाबाई मंदिरातील चोरीही अद्याप उघड झालेली नाही. या मंदिरातून सुमारे 15 लाख रुपयांचे देवाचे दागिने लंपास झाले होते. 

वाळूची तस्करी जोरात...

मिरज शहरातून गांधी चौकी, शहर पोलिस व ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतून बेगमपूर, सोलापूर, कर्नाटक, सातारा येथून मोठ्या प्रमाणात वाळू येते. सध्या वाळू उपसा बंद आहे. पण येथे वाळू जास्त दराने सर्रास मिळते. महसूल विभागाकडून वाळू तस्करांवर कारवाई होते. पण पोलिसांकडून कारवाई सातत्याने होत नाही.