Sat, Jul 11, 2020 12:21होमपेज › Sangli › आक्रमक विरोधकांचे सलामीलाच आव्हान

आक्रमक विरोधकांचे सलामीलाच आव्हान

Published On: Aug 22 2018 12:57AM | Last Updated: Aug 21 2018 8:33PMसांगली : अमृत चौगुले

सांगली- मिरज-कुपवाड महापालिकेत आजपर्यंतच्या सत्ताधार्‍यांवर विरोधकांसह कोणाचाच अंकुश नव्हता. त्यामुळे कारभारात बेबंदशाही माजल्याचे दिसत होते. यामुळेच विकासकामांचा बोजवारा आणि भ्रष्टाचाराचा बोलबाला झाला. याखेपेस मात्र  सत्ताबदल झाल्यानंतर पहिल्याच सलामीला सत्ताधारी भाजपला महापौर, उपमहापौर सभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने खिंडीत पकडत आव्हान उभे केले. त्यामुळे शहर विकासाबरोबरच आघाडीकडून होणारे आरोपांचे हल्ले थोपविताना भाजपला मोठी तारेवरची कसरत करावी लागणार, हे उघड आहे. यामुळे भविष्यात महापालिकेचा कारभार दिशाहीन होणार नाही, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

महापालिकेत गेल्या 20 वर्षांत महाआघाडीचा कार्यकाल वगळता  काँग्रेसचा एकहाती अंमल होता. यामध्ये विरोधक म्हणावे तितक्या प्रमाणात सक्षम नव्हते.  विरोधकांपेक्षा सत्ताधार्‍यांशी सुरात सूर मिसळून कारभार सुरू असल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे; तर सत्ताधारी-विरोधक नेत्यांचाही महापालिका कारभारावर कुठेच अंकुश नव्हता. फक्‍त निवडणूक आणि पदे निवडीपुरताच नेत्यांचा सल्ला, नंतर आम्हीच मालक असा कारभार्‍यांचा पवित्रा असे. यामुळे महापालिकेत विकासकामात अनागोंदी तयार झाली होती. प्रशासनही सत्ताधार्‍यांच्या दोन पावले पुढेच होते. त्यामुळे आतापर्यंत शेकडो कोटी रुपये खर्चूनही शहराला पायाभूत सुविधा मिळू शकल्या नव्हत्या. 

शहरातील अतिक्रमणात अडकलेले खड्डेमय रस्ते, पाणीपुरवठ्याची दुरवस्था, आरोग्य विभागाची उदासीनता, कचरा उठावचा बोजवारा, वाहतुकीची कोंडी हे चित्र वर्षानुवर्षे तसेच होते. वास्तविक याबाबत जागृती, जनआंदोलन उभारणी आणि विकासाच्यादृष्टीने सत्ताधारी आणि प्रशासनाला धारेवर धरण्याचे काम विरोधकांचे होते. नेत्यांनी त्यादृष्टीने कारभार्‍यांना दिशा देणे गरजेचेे होते. पण ते काही झाले नाही.

एकूणच या सर्व कारभाराला वैतागून जनतेने आता भाजपला सत्ता दिली. अर्थात सत्ता परिवर्तन झाले तरी विरोधक काँगे्रेस-राष्ट्रवादीला सक्षम 35 जागांवर जनतेने संधी दिली आहे. भाजपने विकासाची जबाबदारी घेतली तरी चार-दोन सदस्य वगळता त्यांचे सर्वच सदस्य नवे आहेत. उलट काँग्रेस-राष्ट्रवादीकडे अनुभवाबरोबरच सभागृह दणाणून सोडणारी फौज आहे. त्याची झलक काँग्रेसने  महापौर-उपमहापौर निवडणूक लढवण्यातच  दिसून आली. 

भाजपला आम्ही निवडीत चमत्कार घडवू, असा इशारा आघाडीने दिला होता. त्यामुळे  त्या पक्षाच्या नेत्यांनी नगरसेवकांना गोव्यात सहलीला पाठवले. अर्थात माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतरही त्यांचा गोव्यातच मुक्काम कायम ठेवला. धोका टाळण्याची खबरदारी घ्यावी लागली. तेसुद्धा विरोधकांच्या हाती कोलितच मिळाले. त्यांनी निवड सभेतच त्याचा समाचार घेत भाजपला पुरते घायाळ केले. एवढेच नव्हे; तर अटलजींना श्रद्धांजली वाहण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेत भाजपवर कडी केली. 

अनुभवी संतोष पाटील, मैनुद्दीन बागवान, वहिदा नायकवडी, हारुण शिकलगार, दिग्विजय सूर्यवंशी आदींच्या जोडीला मंगेश चव्हाण, उत्तम साखळकर या नवख्या काँग्रेसजनांनीही आक्रमक पवित्रा घेतला. या डावातही नवख्या भाजप सदस्यांनी राजकीय विरोध म्हणून अगोदर निवड आणि नंतर श्रद्धांजली अशी भूमिका घेतल्याने ते अडचणीत सापडले. अर्थात प्रशासनाने यावर तोडगा काढून पडदा पाडला, तरी विरोधकांची सरशी झाली हे उघड आहे. 

सत्तेच्या सुरुवातीलाच भाजपला विरोधकांची ही झलक माघार घ्यायला लावणारी ठरली आहे. पुढे तर विकासकामे मंजुरी आणि कामकाजात त्रुटी शोधून विरोधक  हल्ले चढविणार, हे उघड आहे. 
विरोधकांच्या संख्याबळानुसार दोन प्रभाग समित्या त्यांच्याकडे जाणार, हे उघड आहे. स्थायी सभेतही नऊ-सात असे काठावरचेच बहुमत प्रत्येक विषय मंजुरीला कामात अडचण येणार  आहे. त्यामुळे भाजप नेत्यांसह महापालिकेतील कारभार्‍यांना शहराच्या विकासकामांना गती देणे, कारभार सुधारणे आणि सोबतच विरोधकांचे हल्ले थोपविणे अशा तिहेरी वाटचालीत मोठी कसरत करावी लागणार आहे. 

पुन्हा महाआघाडी... भाजपचा फक्‍त तोंडावळा

मनपात काँग्रेसला थोपविण्यासाठी 2008 मध्ये राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी सर्वपक्षीय महाआघाडीत नेते आणि त्यांचे कारभारी एकत्र केले होते. यामध्ये माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्याबरोबरच मिरज पॅटर्नचे एक शिलेदार सुरेश आवटी सहभागी होते. परंतु महाआघाडीचा गाडा चालवताना रंगलेला सत्तासंघर्ष अवघ्या दोन वर्षांतच बिघाडी करणारा ठरला. विरोधक काँग्रेसने त्याला हवा देत खेळ केला. त्यामुळे  नेत्यांंनाही सपशेल  माघारीची कबुली द्यावी लागली. आजही तेच महाआघाडीचे कारभारी भाजपचे कोअर कमिटीचे नेते म्हणून  गाडा पुढे नेणार आहेत. त्यामुळे त्यांच्यात बिघाडी  होण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी टपून आहेत. ती संधी मिळताच पुन्हा खेळ रंगणार आहे.