होमपेज › Sangli › आव्हान एकरकमी ‘एफआरपी’चेच!

आव्हान एकरकमी ‘एफआरपी’चेच!

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 9:54PMसांगली : विवेक दाभोळे

सन 2018-19 च्या गळीत हंगामासाठी केंद्र सरकारने एफआरपीमध्ये 200 रुपयांची प्रतिटन वाढ घोषित केली आहे. अर्थात यासाठीचा बेस मात्र साडेनऊ टक्कयांवरुन 10 टक्के केल्याने ही वाढ खरेच झाली का, असा सवाल होतो आहे. अर्थात एकरकमी एफआरपी मिळणार का, हाच खरा सवाल उपस्थित होतो आहे. जर ‘एफआरपी’ चे तुकडे पाडण्याची ‘सरकारी’ परंपरा कायम राहिली तर मात्र या वाढीच्या लाभाबाबत शंकाच आहे.‘सीसीइए’ (कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स) च्या शिफारसीनंतर केंद्र सरकारने सन 2018-19 च्या हंगामासाठी  प्रतिटन उसासाठी ‘उचित आणि किफायतशीर मूल्य’ जाहीर केले आहे.  यानुसार आता येत्या हंगामासाठी प्रतिटनाला पहिल्या 10 टक्के साखर उतार्‍यासाठी 2750 रुपये भाव निश्‍चित केला आहे. तसेच  पुढील प्रत्येक एक टक्का साखर उतार्‍यासाठी  275 रुपये जाहीर केला आहे.

राज्याचा विचार करता सांगली, कोल्हापूर, सातारा हे जिल्हे उच्च साखर उतारा विभागात मोडतात. या तीन जिल्ह्यांतील  सरासरी साखर उतारा हा 12.50 टक्के इतका आहे. यानुसार या हंगामासाठी 12.50 टक्कयांसाठी पहिली उचल 3437 रुपये मिळू शकते. मात्र यातून प्रतिटनासाठीची सरासरी तोडणी वाहतूक रुपये 550 वजा केल्यास 2887 रुपयांची पहिली उचल मिळू शकेल.सन 2016 - 17 च्या हंगामासाठी कारखानदार, शासन आणि ऊसदर आंदोलक यांच्यातील  तोडग्यानुसार पहिली उचल एफआरपी अधिक दोनशे अशी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र ही पहिली उचल कारखान्यांनी एकरकमी दिली नाही. दोन दोन तुकड्यांत एफआरपीची घोषणा होत आहे.  

यावेळी जरी एफआरपीत 250 रुपये वाढीची घोषणा होत असली तरी यासाठी साखर उतार्‍याचा बेस हा अर्धा टक्कयाने वाढविला आहे. याचा फटका बसणार हे निश्‍चितच आहे. सन 2012-13 च्या हंगामासाठी 1700 रुपये एफआरपी होती, त्यापुढील हंगामासाठी ती वाढविताना तब्बल 400 रुपयांनी वाढविण्यात आली होती. आताची देखील किमान चारशे रुपयांच्या घरात वाढीची अपेक्षा होती. मात्र केवळ 250 रुपयांचीच वाढ करण्यात आली आहे. आणि जोडीला बेस देखील वाढविला आहे.दुसरीकडे साखरेच्या दरात गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने तेजी राहिली आहे. सरासरी 3700 रुपये प्रतिक्विंटल दर राहिला आहे. येत्या हंगामासाठी दोन महिन्यात साखरेचे मूल्यांकन जाहीर होईल ते जास्तच असणार हे निश्‍चित. यामुळे  या वाढीव एफआरपीचे फायदे किती यावरुनच खरे रणकंदन माजण्याचीच अधिक शक्यता आहे.

जिल्ह्यासाठी पहिली 

उचल 2887 रुपयेसांगली जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा हा 12.50 टक्के आहे. नवीन एफआरपीच्या सुत्रानुसार 10 टक्केसाठी 2750 रुपये नंतरच्या अडीच टक्के उतार्‍यासाठी 687 मिळून 3437 रुपये पहिली उचल मिळू शकते. मात्र यातून तोडणीवाहतूक खर्च 550 रुपये वजा जाता ऊसउत्पादकांच्या हातात 2887 रुपये निव्वळ पडणार आहेत.

दरासाठी संघर्ष अटळ

एफआरपी म्हणजे सरकारने ‘एफआरपी’पेक्षा उसाचा दर कमी होणार नाही याची सरकारने हमी दिलेली असते. अतिरिक्त ऊसउत्पादनाच्या काळात एफआरपीचा शेतकर्‍यांना लाभ होतो. मात्र गेल्या दोन हंगामापासून ऊस क्षेत्र घटल्याचे चित्र होते. यावेळी येत्या हंगामासाठी मात्र ऊसक्षेत्र वाढले आहे. साखर उत्पादन वाढण्याचीच  शक्यता आहे.  यामुळे आता ऊसदरासाठी संघर्ष अधिकच गहिरा होण्याचे संकेत आहेत. मात्र एफआरपी वाढविताना सरकारने साडेनऊ टक्कयांचा बेस हा वाढवून दहा टक्के केल्याने वाढ खरेच झाली का, असा सवाल ऊसउत्पादक करतो आहे.