Mon, Dec 09, 2019 05:38होमपेज › Sangli › मुख्यमंत्र्यांना अपयशाचे कोर्टाकडून सर्टिफिकेट

मुख्यमंत्र्यांना अपयशाचे कोर्टाकडून सर्टिफिकेट

Published On: Mar 30 2019 1:31AM | Last Updated: Mar 29 2019 10:54PM
सांगली : प्रतिनिधी

भाजपकडून मतदारांना पैशांचे आमिष दाखविले जात आहे. मिरजेत असा प्रकार घडला आहे. भाजपातर्फे संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शनही केले जात आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. दाभोलकर-पानसरे खूनप्रकरणी कोर्टाने मुख्यमंत्र्यांना अपयशाचे सर्टिफिकेट दिले असल्याचेही ते म्हणाले. 

ते म्हणाले, नोटाबंदीमुळे कोणाचे भले झाले, हे आता दिसू लागले आहे. राम मंदिर बाजूला राहिले, मात्र भाजपचे टोलेजंग  कार्यालय बांधले गेले.   जवान आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम पंतप्रधान करीत आहेत. निवडणूक आचारसंहिता भंग केली जातेय.   पैशाचे आमिष दाखवून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय.  लीड देणार्‍या आमदारास 10 लाख व सोन्याचे कडे देण्याचे वक्तव्य मिरजेत झाले आहे. हा आचारसंहितेचा भंग आहे. याची दखल निवडणूक आयोगाने घ्यावी.   

ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी प्रचाराची पातळी सोडली आहे. देशाचे पंतप्रधान ज्या पद्धतीने जोरजोरात भाषणे करुन लोकांशी खोटे बोलतात ते पंतप्रधान पदाला न शोभणारे आहे. आक्रस्ताळेपणा करणारा असा पंतप्रधान कधीच देशाने पाहिला नाही. काँग्रेसने उभ्या केलेल्या संस्था मोडल्या जात आहेत. संस्था मोडायला फार अक्कल लागत नाही.

भाजप नेत्यांकडून  घटना बदलण्याची भाषा सातत्याने  केली जात आहे. पेट्रोल, गॅस महाग केले आहे. शेतकरी, व्यापारी, कामगार  यांना दिलेले कोणतेच आश्‍वासन भाजपने  केले नाही. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाजाला आरक्षणाचे आश्‍वासन देवून झुलवत ठेवले आहे. 

वंचित आघाडी मतांच्या विभागणीसाठीच 

मते खाण्यासाठी महाराष्ट्रात एक आघाडी तयार केली आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता केला.  हा डाव लक्षात आल्याने लोकांचा त्यांना प्रतिसाद मिळणे बंद झाले आहे. 

रावेर काँग्रेसला, जळगाव राष्ट्रवादीला 

पाटील म्हणाले, राज्यात आघाडीचे जागा वाटप पूर्ण झाले आहे. रावेत काँग्रेसला सोडले आहे. त्या बदल्यात जळगाव राष्ट्रवादीला मिळाले आहे.