Fri, Dec 13, 2019 06:08होमपेज › Sangli › सांगलीत साडेचार लाखांची घरफोडी

सांगलीत साडेचार लाखांची घरफोडी

Last Updated: Dec 06 2019 1:12AM
सांगली : प्रतिनिधी
येथील मीरा हाऊसिंग सोसायटीतील ओंकार अपार्टमेंटच्या तळमजल्यावरील  सलग  तीन फ्लॅट चोरट्यांनी फोडले. साडेपाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने, सहा किलो चांदी आणि रोख 35 हजार रुपये असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबतची तक्रार महेश चंद्रशेखर ओझा यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. दरम्यान, रोख रकमेसह एक लाख 80 हजार 150 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याची नोंद पोलिस ठाण्यात झाली आहे. 

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः ओझा यांचा येथील एमआयडीसीत पाईप तयार करण्याचा कारखाना आहे. त्यांचे कुटुंब मोठे असून ते तळमजल्यावरील तीन फ्लॅटमध्ये एकत्र राहतात. राजस्थानमध्ये नातेवाईकांच्या लग्नासाठी दि. 24 नोव्हेंबरला ते गेले होते. त्यांच्या गाडीचा चालक घरी थांबला होता. तो दि. 1 डिसेंबर रोजी त्यांना आणण्यासाठी मुंबईस गेला होता. 

त्या दरम्यान चोरट्यांनी  फ्लॅटचा समोरील कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. सर्व बेडरूम आणि त्यातील पाच कपाटांची कुलपे तोडली. त्यातील रोख 35 हजार रुपये आणि साडेपाच तोळे सोन्याचे दागिने घेतले. दागिन्यात प्रत्येकी दोन तोळ्यांची दोन वेढण, दीड तोळ्याचे मंगळसूत्र,सहा किलो चांदीची नाणी आहेत. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर पैसे आणि दागिने ठेवले होते. 

ओझा यांना ही माहिती मंगळवारी सकाळी समजली. त्यांनी तातडीने  माहिती विश्रामबाग पोलिसांकडे तक्रार  दिली. पोलिसांनी  कपाट, दरवाजा यावरील बोटांचे ठसे घेतले आहेत. या अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. या कॅमेर्‍यात आठ चोरटे चित्रित झाले आहेत, असे  ओझा यांनी सांगितले.

पुराच्या फटक्यानंतर आता चोरीचा दणका
ऑगस्टमध्ये  महापुराचा फटका ओझा यांना बसला होता. अनेक महत्वाची कागदपत्रे आणि साहित्य बाद झाले होते. त्या धक्क्यातून सावरत असतानाच त्यांना घरफोडीचा दणका बसला आहे. जे दागिने त्यांचे कुटुंबीय  बरोबर घेऊन गेले होते तेवढे वाचले आहेत.

सांगलीसह जिल्ह्यात घरफोडींचे सत्र सुरूच 
सांगलीसह जिल्ह्यात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. गेल्या काही दिवसांत प्लॉट, फ्लॅट, मंदिर फोडण्याचे प्रकार घडले आहेत. दोन पोलिस कर्मचार्‍यांच्या घरीच घरफोडी झाली आहे. काही ठिकाणी लूटमारीचेही प्रकार झाले आहेत. त्यापैकी बहुसंख्य गुन्ह्यांचा छडा अद्याप लागलेला नाही.