Sun, Jul 12, 2020 17:31होमपेज › Sangli › बिळाशी मतदान केंद्रावर कोकरूड पोलिसाची पत्रकाराशी अरेरावी

कोकरूड पोलिसाची पत्रकाराशी अरेरावी

Published On: Apr 23 2019 10:27AM | Last Updated: Apr 23 2019 9:47AM
बिळाशी (ता.शिराळा): पुढारी ऑनलाईन

बिळाशी (ता.शिराळा) येथे मतदान करण्यासाठी गेलेले पत्रकार डॉ.दिनकर झाडे यांना तेथे ड्युटीवर असणारे पोलिस अरुण नारायण मामलेकर यांनी अरेरावीची भाषा करून एसपीकडे जा नाहीतर कलेक्टरकडे जा, मला फरक पडत नाही, अशी उर्मट व अरेरावीची भाषा वापरली. या घटनेचा महाराष्ट्र पत्रकार संघटनेने निषेध केला असून कोकरूडचे जेष्ठ पत्रकार नारायण घोडे यांनी निवडणूक आयोगाने त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

काय घडले...

महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य व दै. केसरीचे पत्रकार डॉ. दिनकर झाडे हे बिळाशी येथे बूथ क्रमांक १९८ वर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळी लवकर गेले होते. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसराच्या आत त्यांना अनेक खासगी वाहने लावलेली दिसून आली. ही बाब त्यांनी मतदान केंद्रावर उपस्थित कोकरूडचे पोलिस कर्मचारी अरुण नारायण मामलेकर यांच्या निदर्शनास आणून दिली व यामुळे आचार संहितेचे उल्लंघन होत आहे, आपण याबाबतीत कारवाई करावी, ही वाहने तेथून हटवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली.

त्यावेळी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने हे माझे काम नाही, मी फक्त आत काय असेल तेवढेच बघणार, तू मला शिकवू नकोस अशी उर्मट भाषा वापरायला सुरुवात केली. उपस्थित मतदान प्रतिनिधी दिलीप कुंभार, नामदेव भोसले, राजेंद्र साळुंखे,प्रवीण पाटील इत्यादींनी व तेथे निवडणुकीवर देखरेख ठेवणारे अधिकारी यु.पी. पाटील यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो कोणाचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. वरिष्ठांच्याकडे याबाबतीत तक्रार करणार असे त्याला सांगितले असता तू एसपीकडे जा नाहीतर निवडणूक आयोगाकडे, मला काही फरक पडत नाही, अशी उर्मट व एकेरी भाषा वापरून संबंधित पत्रकाराचा अपमान केला आहे.

या बाबतीत त्याला तेथे कार्यरत निवडणूक देखरेख अधिकारी(po) यु.पी.पाटील यांनी १०० मीटरच्या आतील खासगी वाहने हटविण्याची जबाबदारी पोलिस म्हणून त्याची आहे,असे सांगितले. पण त्याने हे माझे काम नाही, निवडणूक आयोगाने ती वाहने हटवावीत, असे बेजबाबदार पणाचे वक्तव्य केले.

या घटनेचा बिळाशी-कोकरूड परिसरातील सर्व पत्रकारांनी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला असून, मामलेकर याने निवडणूक आयोगाच्या कामात हलगर्जीपणा दाखविल्या बद्दल व पत्रकाराचा अपमान केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्याच्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.