विटा : प्रतिनिधी
विट्यात बीएसएनएल या दूर संचार कंपनीची सेवा गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे टेलिफोन आणि ब्रॉडबँडची सेवा खंडित झालेली आहे.
विट्यातील पॉवर हाऊस रस्ता, सराफ कट्टा , गणेश पेठ यांसह काही भागातील टेलिफोन लाईन गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. बीएसएनएल सेवेच्या या खेळखंडोबामुळे सराफ व्यवसाय, बँका, पतसंस्था यांचे व्यवहार विस्कळीत झाले आहेत. याबाबत दूरसंचार कार्यालयाशी संपर्क साधला असता जमिनीच्या खालून गेलेली ऑप्टिकल फायबर तुटली असल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.
गेल्या दोन दिवसापासून टेलिफोन सेवा देखील बंद आहे. जिओ कंपनीच्या वतीने याठिकाणी ऑप्टिकल फायबर टाकण्याचे काम सुरू आहे. यादरम्यानच बीएसएनएलची केबल तुटली असल्याची शक्यता आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना ही केबल जोडून देण्याची सुचना देण्यात आली असल्याचे दूर संचार विभागाचे उपविभागीय अभियंता एम. ए. शेख यांनी सांगितले.