सांगली : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीत विकासकामांच्या जोरावर भाजप जिल्ह्यातील सर्व आठही जिंकेल, असा दावा प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला.
सांगली विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्याच्या बुथमेळाव्यात ते बोलत होते. महापुराने शहर आणि पक्षही पिछाडीवर गेले होते. आता मिशन विधानसभा टार्गेट ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लाागावे, असे ते म्हणाले.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील,आमदार सुधीर गाडगीळ, आमदार पृथ्वीराज देशमुख, भाजपाचे प्रदेशउपाध्यक्ष शेखर इनामदार, प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे, नीता केळकर,आमदार शिवाजीराव नाईक, माजी मंत्री अजित घोरपडे ,महापौर संगीात खोत, दीपक शिंदे, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, अरविंद तांबवेकर, मुन्ना कुरणे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, लोकांची गरज काय आहे हे पासून भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात योजना राबविल्या. लोकांना रस्ते,पाणी योजना यालाही महत्व दिले. पिकांसाठी व सर्वसामनान्यासाठी विमा योजना राबवली. अन्य देशांमध्ये शिक्षण, आरोग्यासह सर्व सुविधा मोफत मिळतात. त्यामुळे तेथे जनतेचे प्रश्नच नसल्याने विकासाला गती मिळते.
ते म्हणाले, राज्यात विरोधकच शिल्लक राहिले नाहीत. पूर्णत राजकीय वातावरण भाजपासाठी अनुकूल आहे. महापुराबाबत सरकार संवेदनशील आहे, हे पूरग्रस्त लोकांनी मदतीतून अनुभवले आहे. जनता, व्यापारी, शेतकर्यांना मदत, नुकसानभरपाईचे आदेश काढले. तत्काळ मदतही वर्ग केली. झालेले नुकसान मोठे आहे. पण त्यातून जनता धीराने उभारत आहे. आमदार गाडगीळ म्हणाले, राजकारण माझा प्रांत नाही. गेली 40 वर्षे सचोटीने व्यवसाय केला. त्यानंतर पक्षाने माझ्यावर जबाबदारी सोपविली. जनतेने, कार्यकर्त्यांनी मला आमदार केले. त्या जोरावरपाच वर्षाच्या माझ्या काळात एक हजार कोटीचा निधी मतदारसंघातील विविध कामासाठी मंजूर करून आणला. सांगली-पेठ रस्त्यासाठी 543 कोटीचा चौपदरी रस्ता मंजूर केला. याच्या लवकरच निविदा काढल्या जातील. पुढील पाच वर्षांत मतदारसंघ मागणीमुक्त करू.
मी हिशोब ठेवणारा माणूस
खासदार पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीत अनेकांनी आव्हाने उभी करण्याचा केला. त्यासाठी जाती-पातीचे राजकारण उभे केले. माझ्यावर खोटे-नाटे आरोप केले. पण लोकांची शक्ती माझ्या पाठीशी आहे. सर्वांनी मदतही केली. मी हिशोब ठेवणारा माणूस आहे. त्यामुळे मदत करणार्यांनी काळजी करु नका. ज्यांनी ती केली त्यांचा उतराई होणार आहे. असे ते म्हणताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.यावेळी शेखर इनामदार ,नीता केळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन भारती दिगडे यांनी केले.
असा आहे उड्डाणपुलाचा लेखाजोखा
चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार गाडगीळ यांनी शहर विकसासाठी प्रत्येक गोष्ट आपल्या मतदारसंघात यावी यासाठी आग्रह धरला. त्यातूनच आयर्विन पुलाला पर्यायी पुल, हरिपूर -कोथळी पूल मंजूर करून घेतला. विधानसभा क्षेत्रातील बारा गावांना त्यांनी मागेल ते दिले. स्वच्छ प्रतिमा असणारे कार्यसम्राट गाडगीळ पुन्हा एकदा निवडणूकीसाठी समोर येत आहेत.महापालिका निवडणूक जिंकायला त्यांची स्वच्छ प्रतिमाच उपयोगी पडली. विधानसभा निवडणूकही ते पुन्हा सहज जिंकतील.
महाजनादेश यात्रा 16 ला सांगलीत
मकरंद देशपांडे म्हणाले, पूर्वी ठरलेली मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा 16 सप्टेंबरला सांगलीत येणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते सहभागी असतील. कासेगांव,पेठ, इस्लामपूर मार्गे पलूस या ठिकाणी याचे स्वागत होणार आहे. अनेक ठिकाणी सभाही होणार आहेत. मिरज ते सांगली रोड शो आणि सांगलीत भव्य सभा होणार आहे. ही यात्रा देशात सर्वाधिक विक्रमी करण्याची तयारी करा. सोबतच 14 ते 20सप्टेंबर दरम्यान सेवा सप्ताह देशभर होणार आहे,यातही सहभागी व्हावे.