Mon, Jul 06, 2020 19:01होमपेज › Sangli › भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगलीत

भाजपची महाजनादेश यात्रा आज सांगलीत

Published On: Sep 16 2019 1:38AM | Last Updated: Sep 16 2019 12:00AM
सांगली : प्रतिनिधी
राज्यभर सुरू असलेली भाजपची महाजनादेश यात्रा सोमवारी (दि. 16) सांगली जिल्ह्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री  चंद्रकांत पाटील यांच्यासह मंत्रिमंडळ, पदाधिकार्‍यांसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख व शहर जिल्हाध्यक्ष आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगितले. 

ते म्हणाले, जिल्हाभर रोड शो व पलूस, तासगावमध्ये सभा  होणार आहेत. सांगलीतही रोड शोद्वारे कर्मवीर भाऊराव पाटील चौकात दुपारी 3 वाजता सभा होणार आहे. यावेळी फडणवीस यांची तोफ कडाडणार आहे. भाजपच्या जिल्ह्यातील प्रचाराचा प्रारंभच होणार आहे. यानिमित्ताने जिल्हा भाजपमय झाला आहे.

देशमुख म्हणाले, कराडमार्गे ही महाजनादेश यात्रा कासेगाव येथे सकाळी 9 वाजता येणार आहे. तेथे आमदार शिवाजीराव नाईक स्वागत करणार आहेत. पेठनाका येथे युवा नेते राहुल महाडिक स्वागत करणार आहेत. तेथून यात्रा इस्लामपुरात येईल. तेथे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नगराध्यक्ष निशिकांत पाटील, विक्रम पाटील आदींसह पदाधिकारी स्वागत करणार आहेत. यात्रा ताकारी मार्गे पलूस येथे सकाळी 11.30 वाजता पोहोचेल. तत्पूर्वी तुपारी येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यात्रेचे स्वागत करणार आहेत. पलूस येथे फडणवीस यांची लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पटांगणात सभा होणार आहे.

ते पुढे म्हणाले, तेथून यात्रा येळावी, पाचवा मैलमार्गे तासगाव येथे 12.30 वाजता पोहोचेल. खासदार संजय पाटील यात्रेचे येळावीत स्वागत  करणार आहेत. तासगावात छत्रपती शिवाजी  महाराज चौकात सभा होणार आहे.  तेथून यात्रा कवठेएकंद, कुमठा फाटा, तानंग फाटामार्गे  मिशन हॉस्पिटल चौक विजयनगरमार्गे सांगलीत येणार आहे. आमदार गाडगीळ भोकरे कॉलेज येथे यात्रेचे स्वागत करतील. तेथून विश्रामबाग मार्गे कर्मवीर भाऊराव पाटील चौक येथे दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची सभेद्वारे तोफ कडाडणार आहे.  यानंतर ाममंदिर चौक, सिव्हिल हॉस्पिटल चौक, शास्त्री चौक असा रोड शो होणार आहे. तेथून ते अंकलीमार्गे जयसिंगपूर, इचलकरंजीला जाणार आहेत. या यात्रेच्या निमित्ताने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या सर्वच पदाधिकार्‍यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे.यात्रेच्या  स्वागत आणि तयारीसाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जंगी तयारी केली आहे. यानिमित्ताने शहर भाजपमय झाले आहे.

भाजप प्रवेशाची उत्सुकता शिगेला...!

राज्यभर भाजप प्रवेशाचे लोण सुरू आहे. त्याअंतर्गत सांगलीतही अनेकजण भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत पालकमंत्री सुभाष देशमुख, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे व जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी दिले होते. त्यांची नावे मात्र जाहीर न करता ‘वेट अँड वॉच’ असे सांगितले होते. त्यामुळे यात्रेदरम्यान जिल्ह्यात अन्य पक्षांतून कोण-कोण भाजपमध्ये प्रवेश करतात याची उत्सुकता लागून राहिली आहे.