सांगली : प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकसभेचे कामकाज फक्त ४३ तास तर राज्यसभेचे कामकाज ४५ तास चालू शकले. दोन्ही सभागृहाचे कामकाजाचे २४८ तास वाया गेले. विरोधी पक्षांच्या आडमुठ्या धोरणांमुळे संसदेचे कामकाज होऊ शकले नाही. एक प्रकारे काँग्रेसने केलेली ही लोकशाहीची थट्टाच आहे. त्याच्या निषेधार्थ भाजपच्या खासदारांनी संसदेच्या प्रांगणातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे धरले.
विरोधी पक्षांच्या वर्तणुकीचा सनदशीर मार्गाने निषेध करण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नवीन कलेक्टर ऑफिस विजयनगर सांगली येथे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, ग्रामीण जिल्हाअध्यक्ष पृथ्वीराजबाबा देशमुख, दिनकरतात्या पाटील, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार जिल्हापरिषद अध्यक्ष संग्रामभाऊ देशमुख ग्रामीण युवा अध्यक्ष गोपीचंद पडळकर, दिपकबाबा शिंदे, वैभव शिंदे, मुन्नाभाई कुरणे, नगराध्यक्ष निशिकांत पाटील व जिल्ह्यातील सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य , आदी मान्यवर व भाजपचे सर्व मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपोषणात सहभागी झाले आहेत.