Sat, Jul 04, 2020 03:35होमपेज › Sangli › सांगली जिल्ह्यात भाजप-सेना फिफ्टी-फिफ्टी?

सांगली जिल्ह्यात भाजप-सेना फिफ्टी-फिफ्टी?

Published On: Oct 01 2019 2:02AM | Last Updated: Oct 01 2019 2:02AM
सांगली : प्रतिनिधी

भाजप-शिवसेनेच्या युतीच्या नव्या फॉर्म्युल्यानुसार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला व चार भाजपला जातील, अशी फिफ्टी-फिफ्टी-ची चिन्हे दिसत आहेत. तसे झाल्यास इस्लामपूर, तासगाव-कवठेमहांकाळ या तीन मतदारसंघांमध्ये भाजप इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरण्याची शक्यता आहे.  पलूस-कडेगाव मतदारसंघ मात्र भाजपकडेच राहण्याची शक्यता आहे.

या नव्या निणर्यामुळे जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुक असलेल्यांच्या तयारीवर पाणी पडले आहे. त्यांच्यापुढे सेनेत जायचे किंवा याखेपेस थांबणे एवढेच पर्याय राहिले आहेत. त्यामुळे राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत.

राज्यात युतीच्या जागा वाटपाचा घोळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. जिल्ह्यातही या दोन्ही पक्षांच्या जागा वाटपाचेही घोडे अडले होते.  त्यासाठी बैठका, चर्चा सुरू होती. परंतु, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी दोन्ही पक्षांना जिल्ह्यात  समान जागा देण्याची मागणी केली  आहे.  त्यानुसार  जिल्ह्यात भाजप आणि सेनेला समान मतदारसंघ द्यायचे का, याबद्दल मुंबईत अद्याप चर्चा सुरू   असल्याचे समजते.    

शिराळा, सांगली, मिरज, जत या चार जागा भाजपला देण्यात येणार आहेत. याचे कारण या चार ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार आहेत. इस्लामपूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ व खानापूर-आटपाडी हे चार मतदारसंघ सेनेने मागितले आहेत. त्यापैकी खानापूर-आटपाडी  पूर्वीपासूनच सेनेकडे आहे. 

इस्लामपूरमध्ये नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी गेल्या पाच वर्षांपासून भाजपतर्फे   तयारी चालविली आहे. तासगाव-कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे व सौ.ज्योती पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.मात्र पलूस-कडेगावमध्ये भाजपकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यासारखा तगडा उमेदवार आहे. त्यांनी गेले काही दिवस प्रचारालाही सुरुवात केली आहे. 

मात्र नव्या सुत्रानुसार हे मतदार संघ आता शिवसेनेकडे जातील अशी चिन्हे आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या तयारीवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत.लोकसभा निवडणुकीत सातारा  मतदार संघात भाजपचे नरेंद्र पाटील यांनाही अशाच प्रकारे शिवसेनेत जाऊन लढावे लागले होते.  येथील इच्छुकांना असेच करावे लागेल.  अर्थात त्यासाठी शिवसेनेचीही मान्यता आवश्यक आहे. अन्यथा शिवसेनेकडून अन्य उमेदवार उभा केला जाण्याची शक्यता आहे. 

जिल्ह्यात चार मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येणार आहेत. त्याबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आहे. त्यात पलूस-कडेगाव, इस्लामपूर, खानापूर-आटपाडी, तासगाव-कवठेमहांकाळ मिळण्याची शक्यता आहे. पक्षाकडे नवीन व तगडे उमेदवार आहेत. ते पक्षाच्या चिन्हावर लढतील. 
- संजय विभुते जिल्हाप्रमुख, शिवसेना 

दोन्ही पक्षांतील चर्चेनुसार जिल्ह्यातील चार जागा शिवसेना व चार जागा भाजपला असे वाटप होण्याची शक्यता आहे. याबाबत दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते चर्चा करीत आहेत. निर्णय झाल्यास दोन्ही पक्ष समन्वयाचे उमेदवार ठरवतील. 
- मकरंद देशपांडे  प्रदेश सरचिटणीस, भाजप