Mon, Jul 06, 2020 22:45होमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात राजकीय हवा तापली

आटपाडी तालुक्यात राजकीय हवा तापली

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMआटपाडी : लतिफ मुलाणी

आटपाडी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीमुळे राजकीय हवा ऐन उन्हाळ्यात  चांगलीच तापली आहे. उमेदवारी छाननी झाल्यानंतर सोमवारपासून पुन्हा राजकीय हालचालींना वेग आला आहे. अनेक ठिकाणी  पक्षविरहित स्थानिक आघाड्या आमने-सामने ठाकल्या आहेत. दरम्यान, यावेळी प्रथमच सरपंचपदाची थेट निवड होणार असल्याने अनेक ठिकाणी कमालीची चुरस निर्माण झाली आहे. वर्षभरापूर्वी जिल्हा परिषद, पंचायत समिती  निवडणुकीच्यावेळी माजी आमदार राजेंद्र देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यासह देशमुख बंधुंनी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारही जागा जिंकल्या. आटपाडी पंचायत समितीवरही प्रथमच भाजपचा झेंडा फडकाविला.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा धुरळा जमिनीवर बसतो ना बसतो तोच तालुक्यात पहिल्या टप्प्यातील सव्वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. थेट सरपंच निवडीमुळे सरपंचपदासाठी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पहावयास मिळाल्या.आता आटपाडी तालुक्यात दुसरे टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात असल्याने प्रबळ नेत्यांनी या निवडणुकीकडे चांगलेच लक्ष दिले आहे. त्याचप्रमाणे गावपातळीवर ग्रामपंचायत ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार रस्सीखेच होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपने तालुक्यात राजकीय वर्चस्व सिध्द केलेले आहे. पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतही भाजपला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे मागील निवडणुकीत मिळवलेले यश कायम राखण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे. त्यामुळे भाजप तालुक्यातील ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला अपयशाचा सामना करावा लागला होता. मात्र पहिल्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या माध्यमातून सेनेने जोरदार कमबॅक केले. आता सेनेचे लक्ष या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे असणार आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार अनिलराव बाबर व माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजीराव पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
खरसुंडी जिल्हा परिषद गटातून काँगे्रसकडून युवा नेते जयदीप भोसले यांनी चांगली लढत देत खरसुंडी गणातून काँगे्रसचा उमेदवार निवडून आणला. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेलकरंजी, मानेवाडी, औटेवाडी, कानकात्रेवाडी या गावांचा समावेश आहे. या गावात जयदीप भोसले यांची भूमिका महत्वाची आहे. याशिवाय थेट सरपंच निवडीमुळे गावागावात चांगली लढत होण्याची शक्यता आहे.

सरपंचपदाचे गावनिहाय आरक्षण :

कानकात्रेवाडी - सर्वसाधारण स्त्री, औटेवाडी- नागरिकाचा मागास प्रवर्ग स्त्री, मानेवाडी- नागरिकाचा मागास प्रवर्ग, मापटेमळा- सर्वसाधारण, पुजारवाडी (आ)- अनुसूचित जाती स्त्री, काळेवाडी- सर्वसाधारण, आंबेवाडी-सर्वसाधारण, बनपुरी - सर्वसाधारण स्त्री, मुढेवाडी - सर्वसाधारण, मासाळवाडी- सर्वसाधारण स्त्री, करगणी- अनुसूचित जाती, निंबवडे- अनुसूचित जाती स्त्री, वाक्षेवाडी- सर्वसाधारण स्त्री, खांजोडवाडी- सर्वसाधारण, पिंपरी खुर्द- सर्वसाधारण स्त्री, नेलकरंजी-सर्वसाधारण, भिंगेवाडी - नागरिकाचा मागास प्रवर्ग, आटपाडी - सर्वसाधारण स्त्री, विभूतवाडी - नागरिकाचा मागास प्रवर्ग, मिटकी - सर्वसाधारण.