Sat, Aug 24, 2019 09:46होमपेज › Sangli › जूनअखेर विश्रामबाग उड्डाणपूल सेवेत

जूनअखेर विश्रामबाग उड्डाणपूल सेवेत

Published On: May 19 2019 1:34AM | Last Updated: May 18 2019 11:50PM
सांगली : प्रतिनिधी

विश्रामबाग-कुपवाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी फोडणारा रेल्वे उड्डाणपूल जूनअखेर सेवेत येणार आहे. उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन्ही बाजूला 10 मीटर सर्व्हिस रोडचेही काम युद्धपातळीवर सुरू आहे. दोन्ही बाजूने ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गही मंजूर असून, त्याची फाईल मुंबईला रेल्वे विभागीय कार्यालयाकडे नियोजनाच्या मंजुरीसाठी आहे. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात हे काम करण्यात येणार आहे. 

येथील विश्रामबागमार्गे वारणाली, लक्ष्मी देऊळ चौक, कुपवाडसह परिसराला ये-जा करण्यासाठी रेल्वे फाटकाचा अडथळा होता. दररोज सुमारे 30 हून अधिक प्रवासी-मालवाहतूक रेल्वे ये-जा करतात. त्यावेळी रेल्वे गेट बंद झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असे. यासाठी येथे रेल्वे उड्डाणपूल व्हावा अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. तत्कालिन काँग्रेसच्या काळात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या पुढाकाराने 2010 मध्ये हा प्रश्‍न मार्गीलागला. पण प्रत्यक्ष कामाचा मुहूर्त व अंमलबजावणी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या पुढाकाराने झाला. 

विश्रामबाग चौक ते पोलिस मुख्यालय  मागच्या बाजूने येणार्‍या रस्त्यापर्यंत 795 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंद उड्डाणपूल उभारण्यात आला. ते काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तर व त्यापैकी रेल्वे रुळावरील उड्डाण पुलासाठीचे 30 मीटर काम रेल्वे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले. दोन्ही बाजूला साडेपाच मीटर सर्व्हिस रोडही ठेवण्यात आले आहेत. एका बाजूला रस्त्याकडेला असलेली खोकी हटवून पोलिस मुख्यालयाचीही काही जागा घेण्यात आली आहे. त्यानुसार आता या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रुपये खर्च झाला आहे. 
दोन्ही बाजूला 5.5 मीटर सर्व्हिस रोडचेही डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याच्या कडेला सांडपाणी निचर्‍यासाठी गटारीचेही काम सुरू आहे. सोबतच रेल्वे रुळामुळे या सर्व्हिस रोड अडणार होता. त्यासाठी दोन्ही रस्त्यांना रेल्वे रुळाखालून भुयारी मार्ग काढण्यात येणार आहे. त्यासाठी 50 लाख रुपयांचे काम रेल्वे प्रशासनाने मंजूर केले आहे. त्या कामाच्या मंजुरीचा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे. या महिन्याच्या अखेरीस त्याला मंजुरी मिळून रेल्वे रुळाखालून खोदाईचे काम होईल. रेल्वे प्रशासनामार्फत त्यासाठी एका दिवसात काम होणार असून, वेळेच्या नियोजनाचीही मागणी करण्यात आली आहे. रेल्वे उड्डाण पुलाचे सर्व काम जूनअखेर पूर्ण होईल. सोबतच सर्व्हिस रोडचेही काम जास्तीत जास्त पूर्ण होण्यासाठी प्रयत्न आहेत. परंतु त्याची मुदत जानेवारी 2020 पर्यंत आहे. त्यामुळे विधानसभा आचारसंहितेपूर्वी हा रेल्वे उड्डाणपूल वापरात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार जूनअखेर त्याचे उद्घाटन करून तो पूल वापरात आणण्यात येणार आहे,. त्यामुळे रेल्वे ये-जा करताना होणारी वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी संपणार आहे,  असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

रेल्वे उड्डाणपुलाचा लेखाजोखा 

*  उड्डाणपुलाची लांबी -रुंदी : 795मीटर लांबी, 10.50 मीटर रुंद.
* एकूण खर्च :  15,97,88,317 रुपये.
* रेल्वे रुळावर रेल्वे प्रशासनाचे काम : 30 मीटर, खर्च : 5 कोटी.
* कामास प्रारंभ : 10 ऑगस्ट 2016
* सर्व्हिस रोड : पुलाच्या दोन्ही बाजूला 5.5 मीटर (गटारी स्वतंत्र)
* एकूण खर्च :  3.44 कोटी, * कामास प्रारंभ : 8 जानेवारी 18
* रेल्वे रुळाखालून दोन्ही बाजूला भुयारी मार्ग : 50 लाख