होमपेज › Sangli › मिरजेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे तळ्यात-मळ्यात 

मिरजेत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे तळ्यात-मळ्यात 

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 23 2018 8:58PMमिरज : जे. ए. पाटील

महानगरपालिका निवडणुकीसाठी मिरज शहरात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या तळ्यात, मळ्यातील भूमिकेमुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे नेतेही चिंतेत आहेत. रेडीमेड कार्यकर्त्यांच्या पळवापळवीमुळे यंदाची निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या स्थापनेपासून सन 2008 चा राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाआघाडीचा एकवेळचा अपवाद वगळता सातत्याने काँग्रेसची सत्ता राहिली आहे. मिरज शहरात सुरुवातीपासून काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना फारसे स्थान नव्हते. सन 2008 मध्ये काँग्रेसमधीलच दिग्गज मंडळी राष्ट्रवादीत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाआघाडी करण्यात आली.  या महाआघाडीला मिरजेत 17 जागा मिळाल्या. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ 7 जागा मिळाल्या.गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीतून  मिरज शहरातील नेते  पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे  गेल्या वेळच्या निवडणुकीत काँग्रेसला 16 जागा मिळाल्या. महापालिकेत काँग्रेसची सत्ता आली. परंतु काँग्रेसमधून मिरजेतून निवडून गेलेल्या नगरसेवकांमध्ये पुन्हा फाटाफुटीचे ग्रहण लागले. 

यामुळे महापालिकेत काँग्रेसची सत्ता असली तरी काँग्रेसमधून फुटलेल्या मिरजेतील नगरसेवकांच्या पाठबळावर राष्ट्रवादी काँग्रेसने स्थायी समितीचे सभापतीपद पटकावले.काँग्रेसच्या कारभारावर मिरज पॅटर्नने आपले नियंत्रण ठेवले. सन 2013 च्या निवडणुकीत  जयंत पाटील यांंच्या विरोधात सगळा मिरज पॅटर्न काँग्रेसमध्ये गेला. त्यावेळची निवडणूक प्रामुख्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये झाली.  महापालिकेत सध्या काँग्रेसची सत्ता असली तरी मिरज पॅटर्न प्रणित काँग्रेसमधील नगरसेवक पुन्हा बाहेर पडले.  त्यांनी काँग्रेसला आपला हिसका दाखवला. राष्ट्रवादीला अप्रत्यक्षपणे मदत करीत राष्ट्रवादी च्या मिरजेतील नगरसेविकेला स्थायी समिती सभापती पद मिळवून दिले होते. 

सत्तेसाठी एकत्र यायचे. सत्ता मिळाल्यानंतर सत्तेवर आपला अंकुश ठेवण्याचे काम मिरज पॅटर्नने केले. त्यामुळे गेल्या काही वषार्ंत महापालिका राजकारणात मिरज पॅटर्नचाच दबदबा राहीला आहे.या निवडणुकीसाठी काँग्रेसमधून मिरज पॅटर्न पुन्हा बाहेर पडला आहे. या पॅटर्नमधील बहुसंख्य लढाऊ   नगरसेवक आता भाजपच्या गळाला लागले आहेत.  मिरज संघर्ष समितीचेही आता पुन्हा पुनर्जीवन झाले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून भाजपला फारसे यश मिळाले नव्हते. तथापि यावेळी या पक्षाने  सत्ता मिळविण्याच चंग बांधला आहे. स्वत:च्या पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून भाजपच्या नेत्यांनी आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसेमधील रेडीमेड लढाऊ  कार्यकर्त्यांना जवळ केले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आता उमेदवारांची शोधाशोध करावी लागते आहे. मनसे आणि जनता दलाचेही नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याने या पक्षांचे अस्तित्व या निवडणुकीत दिसणार की नाही असा प्रश्‍न आहे.

मिरजेच्या राजकारणाचा अंत भाजपला तरी लागणार का?

नगरपालिका किंवा महापालिका असो मिरजेचे राजकारण सर्वपक्षीय आणि सातत्याने बदलते राहिले आहे. मिरजेतील राजकारण माजी मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनाही समजू शकले नाही. त्यानंतरच्या काळात काँग्रेसच्या नेत्यांना आणि जयंत पाटील यांनाही मिरजेचे राजकारण समजू शकले नव्हते. आता  भाजप सक्रीय झाला आहे. आमदार सुरेश खाडे यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक जिंकली असली तरी महापालिकेचे राजकारण आणि त्यांनी जवळ केलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांकडून त्यांना  काय आणि कसा अनुभव मिळतो, हे पहावे लागेल.