Mon, Jul 06, 2020 22:44होमपेज › Sangli › जतचा सहायक पोलिस निरीक्षक जाळ्यात

जतचा सहायक पोलिस निरीक्षक जाळ्यात

Published On: Nov 28 2018 1:23AM | Last Updated: Nov 28 2018 12:19AMजत/ येळवी : प्रतिनिधी

जत पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन वसंत कांबळे यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. पोलिस ठाण्यातच लाच घेताना कांबळे यांना अटक करण्यात आली.

 कांबळे अनेक वर्षे जत पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. त्यांचा कारभार नेहमीच वादग्रस्त होता. त्यांच्या विरोधात वरिष्ठांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. एका सोलर कंपनीने सौरऊर्जा प्रकल्पाचे अनुदान देण्याचे आमिष दाखवून तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांची फसवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा जत पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक  कांबळे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात कारवाईसाठी कांबळे यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदाराने कांबळे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली होती.  विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता कांबळे यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त संदिप दिवाण,अप्पर पोलिस उपायुक्त राजकुमार गायकवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक राजेंद्र सांळुखे,संजय कलकुटकी,भास्कर भोरे,जिंतेद्र काळे,संजय संकपाळ, रविंद्र धुमाळ,बाळासाहेब पवार,अविनाश सागर  यांच्या पथकाने मंगळवारी जत पोलिस ठाण्यात सापळा रचला. कांबळे याने तक्रारदारांकडून पोलिस ठाण्यातच वीस हजार रूपयांची लाच घेतली.त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना  पकडले.कांबळे यांच्या विरोधात जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
गेल्या चार वषार्ंत जत पोलिस ठाण्याचे चार अधिकारी लाचलुचपत  प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत.

वादग्रस्त अधिकार्‍यांच्या जतमध्ये बदल्या 

सांगली बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे म्हणाले, वादग्रस्त ठरलेल्या  आणि निलंबनाची कारवाई झालेल्या आधिकार्‍यांच्या  सर्रास जतमध्ये   बदल्या केल्या जातात. ज्या शेतकर्‍यांची फसवणूक झाली होती त्यांना न्याय देण्याऐवजी खंडणीची तक्रार दाखल करण्याची धमकी पोलिस अधिकार्‍यांनी दिली होती. याबाबत संबंधित शेतकर्‍यांनी तक्रारदेखील केली होती. परंतु, त्यांची प्रशासनाने दखल घेतली नाही.