Fri, Jul 10, 2020 18:18होमपेज › Sangli › सहायक संरक्षण अधिकारी लाच घेताना मिरजेत जेरबंद

सहायक संरक्षण अधिकारी लाच घेताना मिरजेत जेरबंद

Published On: Aug 24 2019 1:29AM | Last Updated: Aug 23 2019 11:27PM
मिरज : प्रतिनिधी

कौटुंबिक हिंसाचाराविरोधात नोटीस काढण्यासाठी सातशे रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी  सहायक संरक्षण अधिकारी प्रदीप हिराचंद काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.

कौटुंबिक हिंसाचाराविरोधात एका महिलेने सासरच्या लोकांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी न्यायालयाने अभय केंद्र आणि महिला व बालविकास विभागाकडील सहायक संरक्षण अधिकारी प्रदीप काळे यांना सासरच्या कुटुंबातील सदस्यांना नोटीस काढण्याची सूचना केली होती.

त्यानुसार  नोटीस काढण्यासाठी काळे याने पीडितेकडे सातशे रुपयांची मागणी केली. मिरज बसस्थानकात  सातशे रुपयांची लाच स्वीकारत असताना काळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले. पोलिस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने ही कारवाई केली. 

याबाबत महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान मिरज पंचायत समिती आवारात अभय केंद्र आहे.  हे केंद्र जिल्हा प्रशासनाच्या महिला व बाल विकास अधिकारी यांच्या अखत्यारीत येते. त्यामुळे या लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईशी मिरज पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेचा कोणताही संबंध नसल्याचे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.