सांगली : प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीत प्रत्येक भाजप उमेदवाराने प्रचारासाठी जिवाचे रान केले होते. लोकसभा निवडणुकीतही महायुतीचे उमेदवार खासदार संजय पाटील यांच्यासाठी प्रचाराचा तोच पॅटर्न राबवून विक्रमी मताधिक्य द्या, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. भाजपचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, पराभूत उमेदवार, कार्यकर्त्यांची सांगलीत बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भाजप प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, लोकसभा क्षेत्र संयोजक शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, जि. प. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, दिलीप सूर्यवंशी, सुरेश आवटी, भालचंद्र पाटील, मुन्ना कुरणे, श्रीकांत शिंदे आदिंसह नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पाटील यांनी प्रभागनिहाय प्रचार आणि तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले, महापालिका निवडणूक सहा महिन्यांपूर्वीच झाली आहे. त्याचा माहोल अजूनही आहे. भाजपची एकहाती सत्ता आली. मागील निवडणुकीत आपल्याकडे केवळ सात-आठ नगरसेवक होते, ते आता तब्बल 46 झाले आहेत. जे पराभूत झाले तरी त्यांनीही तोडीस तोड मते घेतली आहेत. त्यामुळे सर्वच 20 प्रभागात आपल्याला हजारो कार्यकर्ते मिळाले आहेत. जे मागील 2014 च्या निवडणुकीत नव्हते. तरीही आपण विक्रमी मताधिक्य घेतले होते. केंद्र, राज्य शासन आणि आता मनपाच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या, मंजूर केलेल्या विकासाचा लेखाजोखा जनतेत पोहोचवा. त्यांनी सूचनाही ऐकून घेतल्या. शंकांचेही निरसन केले. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह प्रमुख पदाधिकार्यांचीही त्यांनी बैठक घेतली.
निवडणूक तापलीय, गाफील राहू नका
चंद्रकांत पाटील म्हणाले, सुरुवातीला भाजपसमोर लढायला उमेदवार तयार होत नसल्याचे चित्र होते. त्यामुळे आपण एकतर्फी निवडणूक जिंकणार अशी परिस्थिती होती. पण आता गेल्या आठ-दहा दिवसांत चित्र बदलले आहे. त्यामुळे गाफील न राहता सावधपणे प्रचाराची चोख यंत्रणा राबवा. विरोधकांचा कारभार काय आहे ते जनतेला माहीत आहे. त्यामुळे विक्रमी मताधिक्य मिळण्यासाठी सावधपणे भूमिका घ्या.