Sun, Dec 17, 2017 08:02होमपेज › Sangli › सांगली : खुनाच्या मूळ हेतूचा तपास सुरू

सांगली : खुनाच्या मूळ हेतूचा तपास सुरू

Published On: Dec 08 2017 1:42AM | Last Updated: Dec 07 2017 11:59PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेत कोथळेचा खून कामटेसह त्याच्या साथीदारांनी कोणत्या हेतूने केला, याचा तपास गतीने सुरू आहे. सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास येऊन एक महिन्याचा कालावधी झाला आहे. आजपर्यंत झालेल्या तपासाचा आढावा घेतला आहे. तपास समाधानकारक असल्याची माहिती सीआयडीचे पोलिस अधीक्षक श्रीकांत पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. 

अनिकेतच्या खुनाचा तपास 

दि. 8 नोव्हेंबरला सीआयडीकडे देण्यात आला होता. त्याला आता एक महिना पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यास अजून दोन महिन्यांचा अवधी आहे. या प्रकरणात आवश्यक असणारे आणखी तांत्रिक तसेच अन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. अनिकेत व अमोल भंडारे यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतील  या उद्देशाने त्यांना मारहाण केल्याचे कामटे याचे म्हणणे आहे. 

मात्र त्याचा नेमका मृत्यू मारहाणीत झाला, की ठरवून त्याला मारून मृतदेह नष्ट करण्यात आला. याबाबत तपास गतीने सुरू आहे. त्याशिवाय कामटेने त्यादिवशी पोलिस डायरीत केलेली नोंद तसेच अन्य ठिकाणी असणारे त्याचे हस्ताक्षरही तपासण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संबंध आहे अशांकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे. 

अनिकेतचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावेपर्यंत तसेच त्यानंतरही कामटेसह अन्य संशयितांनी कोणा-कोणाशी फोनवर संभाषण केले आहे. अशांकडे मोबाईल कॉल डिटेल्सनुसार चौकशी सुरू आहे. काही लोकांची चौकशी करण्यात आली आहे तर काहींकडे चौकशी करण्याचे काम सुरू आहे, असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. 

घडलेल्या घटनेचे ठोस आणि सबळ पुरावे गोळा करण्यासाठी सीआयडीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय तांत्रिक पुरावेही तितकेच महत्वाचे असल्याने तेही गोळा करण्यात येत आहेत. कामटे सातत्याने पोलिस ठाण्यात आणलेल्या संशयितांना बेदम मारहाण करीत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्याच्या मानसिकतेची चाचणी केली का या प्रश्‍नावर ते म्हणाले, अशी त्याची कोणतीही चाचणी करण्यात आली नाही. त्याशिवाय त्याच्याकडील चौकशी दरम्यान तो मनोरूग्ण असल्याचेही दिसून आले नसल्याचे ते म्हणाले.