Mon, Sep 16, 2019 05:31होमपेज › Sangli › भाळवणीत सापडला प्राचीन जैन शिलालेख

भाळवणीत सापडला प्राचीन जैन शिलालेख

Published On: Apr 06 2019 1:50AM | Last Updated: Apr 05 2019 9:21PM
सांगली : प्रतिनिधी

खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे 950 वर्षांपूर्वीचा शिलालेख सापडला आहे. यामुळे सांगली जिल्ह्याच्या प्राचीन इतिहासावर प्रकाश पडण्यास मदत होणार आहे. मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. गौतम काटकर,  मानसिंगराव कुमठेकर यांनी हा शिलालेख शोधून काढला आहे.

चालुक्य राजा सोमेश्‍वर (दुसरा) उर्फ भुवनैकमल्ल यांच्या राजवटीत भाळवणी येथील प्राचीन जैनबस्तीचा जीर्णोध्दार भाळवणी येथील तत्कालीन 60 सामान्य शेतकरी व व्यापार्‍यांनी जैन बस्तीच्या जीर्णोध्दारासाठी पुढाकार घेऊन दान दिले आहे.  या बस्तीसाठी जमीन, फुलांची बाग व दुकानातील उत्पन्न दान दिल्याची माहिती देणारा हा  लेख आहे.  या लेखाने जिल्ह्यातील प्राचीन व्यापारी श्रेण्या, त्यांची कामगिरी, जैन धर्मियांचे स्थान यांची माहिती मिळण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यातील हा सर्वांत जुना हळेकन्नड शिलालेख ठरला आहे.

भाळवणीच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास करीत असताना मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक प्रा. काटकर आणि कुमठेकर यांना भाळवणी येथे हळेकन्नड लिपीतील शिलालेख आढळून आला. या शिलालेखाचे ठसे घेऊन त्यांचा वर्षभर अभ्यास करण्यात आला. राहुल गंगावणे, बाळासाहेब पाटील यांचे त्यांना यासाठी सहकार्य लाभले. हा शिलालेख चालुक्य राजा सोमेश्‍वर (दुसरा) याच्या राजवटीतील आहे. सोमेश्वर याची कारकिर्द सन 1068 ते 1076 अशी केवळ आठ वर्षेच होती. या शिलालेखामुळे सोमेश्‍वराच्या राजवटीची नवी माहिती उजेडात आली आहे. शिलालेखातील दान हे 20 फेब्रुवारी 1070 रोजी देण्यात आले आहे. 

या लेखाचे तीन भाग आहेत. प्रारंभी जैन देवतेची स्तुती करण्यात आली आहे. नंतर दानलेख लिहिला आहे. शेवटच्या भागात शापवचन लिहिले आहे. भाळवणी येथे  प्राचीन मूळसंघ नावाच्या जैन बस्तीचा गावातील सामान्य शेतकरी आणि प्रमुख व्यापारी यांनी मिळून जीर्णोध्दार केला असल्याची माहिती या लेखातून मिळते. या लेखामुळे सांगली जिह्याच्या प्राचीन इतिहासात मोठी भर पडली आहे.

भाळवणी ही चालुक्य राजांची उपराजधानी

भाळवणी हे प्राचीन काळापासून प्रसिध्द गाव आहे. कल्याणीहून राज्य करणार्‍या चालुक्य राजांची भाळवणी ही उपराजधानी होती. हे गाव एक प्रमुख व्यापारी पेठ होते. भाळवणी येथे यापूर्वी दोन कानडी आणि एक देवनागरी शिलालेख सापडला आहे. त्यापैकी दोन चालुक्यकालीन तर एक यादवनृपती, दुसरा सिंघण याच्या काळातील आहेत. हे सर्व शिलालेख सध्या कराड येथे आहेत.