Tue, Jul 14, 2020 02:22होमपेज › Sangli › आखाडा लोकसभेचा; तालीम विधानसभेची !

आखाडा लोकसभेचा; तालीम विधानसभेची !

Published On: Mar 12 2019 1:50AM | Last Updated: Mar 12 2019 1:50AM
शिराळा : विठ्ठल नलवडे

लोकसभा निवडणुकीसाठी शिराळा विधानसभा मतदारसंघात राजकीय हवा तापू लागली आहे. त्यामुळे राजकीय समीकरणे बदलत असतानाच्या काळात यावेळची निवडणूक नेत्यांसाठी कसोटी पाहणारी ठरणार आहे. अर्थात, या विधानसभा  मतदारसंघात लोकसभेच्या आखाड्यात विधानसभेची रंगीत तालीम सुरू असल्याचे चित्र आहे.

सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खा. राजू शेट्टी यांच्या पाठीशी असणारे आ. शिवाजीराव नाईक हे आता भाजप- शिवसेना युती झाल्यामुळे  शेट्टी यांच्या विरोधात असणार आहेत. आ. नाईक, राज्यमंत्री सदाभाऊ खोत व शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात सातत्याने आता बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

ऊसदरासाठी सातत्याने संघर्ष करणारे खा. राजू शेट्टी यांचे कट्टर विरोधक असलेले आ. जयंत पाटील, माजी आ. मानसिंगराव नाईक, काँगे्रसचे नेते सत्यजित देशमुख यांना महाआघाडीमुळे राजू शेट्टी यांच्या पाठीशी ठाम राहावे लागणार आहे.   

भाजप-शिवसेनेची युती झाल्यामुळे हा मतदारसंघ सेनेला गेला आहे. शिवसेनेने या ठिकाणी  धैर्यशील माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे. महाआघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी झाल्यास  खा. राजू शेट्टी हेच उमेदवार असणार आहेत.

शिराळा  पंचायत समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे.  याचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारास होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची शिराळा विधानसभा मतदारसंघात असलेल्या वाळवा तालुक्यातील 49 गावांवर मजबूत पकड आहे. तरीदेखील गेल्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी या भागात चांगले मतदान घेतले होते. 

याचदरम्यान,  शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील, अभिजित पाटील यांची वाळवा तालुक्यात असणार्‍या 48 गावांतील ताकत शिवसेना-भाजपचे उमेदवार धैर्यशील माने यांना मिळणार आहे.   शिराळा विधानसभा  मतदारसंघात  दोन नाईकांची  युती  किंवा नाईक आणि देशमुखांची एकी होईल तोच उमेदवार विजयी होतो, हा इतिहास आहे. याला खो घालण्यासाठी की काय  यावेळी नानासाहेब महाडिक यांचे सुपुत्र सम्राट महाडिक यांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी ते इच्छुक आहेत. भाजपने उमेदवारी दिली नाही, तर नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षातून ते विधानसभा निवडणूक लढवणार, हे निश्‍चित आहे.

दिग्गज नेत्यांचा सातत्याने संपर्क 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी आ. मानसिंगराव नाईक, काँग्रेसमधून  सत्यजित देशमुख, भाजपतर्फे आ. शिवाजीराव नाईक हे विधानसभा निवडणूक लढणार हे निश्‍चित आहे. या नेत्यांनी मतदारसंघात सातत्याने संपर्क दौर्‍यांवर भर ठेवला आहे.  शिराळा विधानसभा मतदारसंघात वाळवा तालुक्यातील 49 गावांचा समावेश आहे. यापूर्वीच्या प्रत्येक निवडणुकीत शिराळ्यातील उमेदवारांना वाळव्यातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नानासाहेब महाडिक यांच्या गटाची मदत होत होती; मात्र या निवडणुकीत महाडिक यांनी आजवर आम्ही मदत केली आता शिराळ्यातील नेत्यांनी आम्हाला मदत करावी, अशी भूमिका घेऊन उमेदवारीसाठी दंड थोपटले आहेत.