Sat, Jul 04, 2020 00:21होमपेज › Sangli › छळ करून तिहेरी तलाक

छळ करून तिहेरी तलाक

Published On: Dec 22 2018 1:42AM | Last Updated: Dec 22 2018 12:24AM
सांगली : प्रतिनिधी

विवाह झाल्यानंतर लगेच संसारोपयोगी साहित्य द्यावे, माहेरहून पैसे आणावेत यासाठी शारीरिक, मानसिक छळ करून नंतर जबरदस्तीने माहेरी सोडले. माहेरी सोडल्यानंतर तलाक दिल्याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात मुस्लिम पर्सनल लॉसह कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिहेरी तलाकवर बंदी आणल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉनुसार जिल्ह्यात पहिल्यांदाच असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

इम्रान दिलावर हैद्राबादे, सासू मजमुन्नीसा हैद्राबादे, नणंद इरफाना हैद्राबादे, आजे सासू (नाव नाही), पतीचा मामा शौकत बेग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. सांगलीतील गणेशनगर येथील मुलीचा 11 फेब्रुवारीला मिरजेत इम्रान हैद्राबादे याच्याशी मिरजेत विवाह झाला होता. त्यानंतर पीडित महिला त्याच्यासोबत मंचर (जि. पुणे) येथे रहात होती. विवाह झाल्यापासून 13 एप्रिलपर्यंत पतीसह सासरच्या मंडळींनी संसारोपयोगी साहित्य आणावे. माहेरहून पैसे आणावेत यासाठी तिचा छळ सुरू केला. त्यानंतर सर्व संशयितांनी पीडितेला वारंवार टोचून बोलणे सुरूच ठेवले होते. तसेच तिला कित्येक दिवस उपाशी ठेवले जात होते. शिवाय रात्री, अपरात्री तिला घरातून बाहेर काढले जात होते. 13 एप्रिलरोजी अचानक महिलेच्या पतीने तिला जबरदस्तीने सांगलीत माहेरी आणून सोडले. त्यानंतर फोनवर त्याने तुला तलाक दिला आहे, असे सांगितले. त्यानंतर 30 जुलै, 31 ऑगस्ट आणि 30 सप्टेंबरला पीडितेला तलाक दिल्याच्या तीन नोटिसा पाठवण्यात आल्या. पहिली नोटीस आल्यानंतर पीडितेच्या माहेरच्यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र सासरच्या मंडळींनी त्यांचे काहीच ऐकले नाही. नंतर तिला तलाकच्या दोन नोटिसा पाठवून दिल्या. त्यानंतर शुक्रवारी पीडित महिलेने पतीसह सासरच्या मंडळींनी शारिरिक, मानसिक छळ करून तिहेरी तलाक दिल्याची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार सर्व संशयितांविरोधात मुस्लिम पर्सनल लॉच्या कलम 3 व 4 नुसार तसेच कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सतीश बागडी अधिक तपास करीत आहेत. 

तिहेरी तलाकविरोधात पहिलाच गुन्हा

केंद्र शासनाने तोंडी, लेखीसह अन्य माध्यमांद्वारे दिल्या जाणार्‍या तिहेरी तलाकविरोधात विधेयक संमत केले आहे. त्यानुसार तिहेरी तलाक देणे बेकायदेशीर मानले जाते. अशा प्रकारे तिहेरी तलाक देणार्‍याला तीन वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सांगली जिल्ह्यात तिहेरी तलाकविरोधात पहिलाच गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. उल्हास चिप्रे यांनी सांगितले.