Wed, Feb 26, 2020 18:43होमपेज › Sangli › ‘सीएए’ समर्थनार्थ सांगलीत अभाविपची तिरंगा यात्रा

‘सीएए’ समर्थनार्थ सांगलीत अभाविपची तिरंगा यात्रा

Last Updated: Jan 23 2020 11:21PM
सांगली : प्रतिनिधी
नागरीकत्व दुरुस्ती कायदा (सीएए)च्या समर्थनाथ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने (अभाविप) गुरुवारी सांगलीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी भव्य 300 मीटर तिरंगा ध्वज घेऊन फेरी काढली. 

यावेळी प्रदेश संघटनमंत्री स्वप्निल बेगडे यांनी हा कायदा देशहिताचा आणि शेजारच्या तीन राष्ट्रांतून घुसखोरी करणार्‍यांविरोधात आहे. परंतु विरोधकांकडून जनतेत दिशाभूल करून त्याविरोधात चुकीची वातावरण निर्मिती केली जात असल्याचा आरोप केला. 

यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. गुरू वाणी, विशाल जोशी, दीपांजली पिसे, जयश्री पाटील, ऋषिकेश पाटील, भाजप युवामोर्चाचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दीपक माने, प्रथमेश वैद्य, राहुल माने, बाहुबली छत्रे, ऋषिकेश पोतदार, माधुरी लड्डा, रोहन बोरावत, हर्षवर्धन पाटील राजू जाधव, चेतन माडगूळकर आदी उपस्थित होते.

एबीव्हीपीच्यावतीने प्रतिवर्षी 212 ते 23 जानेवारी (स्वामी विवेकानंद जयंती ते नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती) या कालावधीत युवक सप्ताह करण्यात येतो. त्याअंतर्गत आणि सीएएसमर्थनासाठी पदयात्रेचे आयोजन केले होते. येथील टिळक चौकात आमदार सुधीर गाडगीळ यांनी पदयात्रेचे उद्घाटन केले. पदयात्रा हरभट रस्ता, महापालिका चौक, राजवाडा चौक, स्टेशन चौक, आझाद चौक, आमराई रस्ता ते कॉलेज कॉर्नर या मार्गावरून निघाली. कॉलेज कॉर्नर चौकात पदयात्रेचे सभेत रूपांतर झाले.

यावेळी बेगडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून दहशतवादाला चाप लावण्यात आला. पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना अद्दल घडविली. काश्मीरचा प्रश्न मार्गी लावला. भारताचा भाग असूनही काश्मिरात वेगळा राष्ट्रध्वज, वेगळे कायदे हा वषानुवर्षांचा अनागोंदी कारभार संपविला. त्यामुळे काश्मीरात आता शांतता निर्माण झाली आहे. 

ते म्हणाले, याच हेतूने पाकिस्तानसह आसपासच्या देशातून घुसखोरीला चाप लावण्यासाठीच सीएए कायदा आणला आहे. परंतु राजकीय सूडबुद्धीने अनेक राज्यांत विरोधक दिशाभूल करीत आहेत. परंतु मोदी, गृहमंत्री अमित शहा मागे हटणार नाहीत. जनेतनेही सुरक्षेच्यादृष्टीने त्याला पाठबळ द्यावे.