Sun, Apr 21, 2019 06:04होमपेज › Sangli › पाडव्याला मेंढर पळविण्याची अनोखी परंपरा

पाडव्याला मेंढर पळविण्याची अनोखी परंपरा

Published On: Nov 09 2018 2:06PM | Last Updated: Nov 09 2018 2:06PMमांजर्डे (सांगली) : पुढारी ऑनलाईन 

सांगली जिल्ह्यतील तासगाव तालुक्यात पूर्व भागातील दुष्काळी टप्प्यातील बलगवडे एक छोटेशे गाव.. जेमतेम तीन हजाराच्या आसपास लोकसंख्या असणार गाव... गावांत अनेक परंपरांचे जतन केले जाते. अशीच एक परंपरा दिपावली पाडव्याच्या दिवशी ग्रामस्थानी जोपासली आहे. ती म्हणजे गावातील बिरोबा मंदिराच्या समोर मेंढरं पळविण्याची परंपरा.

दिपावली पाडव्याला गावातील ५ ते ६ कुटुंबातील लोक सकाळी लवकर उठून आपल्या घरातील मेंढरं रंगवून त्यांना हार फुले व पायात चाळ घालतात. रंगीबेरंगी नटविलेली मेंढरे गावातील बिरोबा मंदिराच्या ठिकाणी आणली जातात व तेथे मंदिराला पाच वेढे काढण्याची प्रथा आहे. यावेळी दोन ग्रामस्थ आपल्या हातात रस्सी घेऊन ती जमिनीलगत टाकतात व वेडीवाकडी हालवितात. सर्व मेंढरे ही रस्सी चुकवून उंच उडी मारून पार करतात. यावेळी वरील बाजूला पाच फूट अंतरावर मानाचा नारळ बांधलेला असतो. ज्याची मेंढरे तो नारळ प्रथम शिवतील त्याला तो नारळ आणि तीन हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. यावेळी गावातील ग्रामस्था,लहान मुले, तरुण यांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.

याबाबत शिवाजी बुधावले यांना विचारले असता ते म्हणाले, आमच्या मागील अनेक पिढ्यांपासून बलगवडे गावात ही परंपरा सुरू आहे. आम्ही गावातील काही धनगर व नाईक समाजातील कुटुंबांनी ही परंपरा जपण्याचा प्रयत्न केला आहे. दिपावली पाडव्याला हा मेंढरांचा सण म्हणून आम्ही साजरा करतो.