होमपेज › Sangli › सरकारकडून लोकशाही, शेतकर्‍यांची थट्टा : अजित पवार 

सरकारकडून लोकशाही, शेतकर्‍यांची थट्टा : अजित पवार 

Published On: Apr 07 2018 2:04AM | Last Updated: Apr 06 2018 10:17PMशिराळा : प्रतिनिधी

लोकशाहीची, शेतकर्‍यांची थट्टा करणार्‍या, जनतेला लुबाडणार्‍या, समाजात जातीय तेढ निर्माण करणार्‍या या भ्रष्ट शिवसेना-भाजप सरकारला आता खाली खेचून पूर्णविराम देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्‍लाबोल आंदोलनाची जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सुमन पाटील, सम्राटसिंह नाईक, विश्‍वप्रतापसिंग नाईक, गौतम पोटे, किर्तीकुमार पाटील, विश्‍वास कदम, विलासराव शिंदे, देवराज पाटील, अमरसिंह नाईक, राजेंद्र निकम, बसवेश्‍वर शेटे प्रमुख उपस्थित होते.

पवार म्हणाले, सरकारने शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता त्यांची थट्टा केली आहे.  पोलिसच हत्या करू लागले आहेत. पंतप्रधान काळा पैसा आणतो म्हणाले. पैसा आणला नाही, केवळ  आश्‍वासने आणि भाषणबाजी होत आहे.

ते म्हणाले, दूध, उसाला भाव दिला नाही. ज्यांनी उसाचे कांडे पाहिले नाही ते काय, उसाला दर देणार आहे. आमच्या सत्तेत 2.75 लाख कोटींचे  राज्यावर कर्ज होते. ते आता 4 लाख कोटीच्या घरात गेले आहे.  अहमदाबाद मुंबई-बुलेट ट्रेन काढून राज्याच्या 1.25 लाख कोटी कर्ज डोक्यावर ठेवले आहे. ते पैसे वाकुर्डे-टेंभू यासारख्या योजनांना दिले असते तर या पाणी योजना पूर्ण झाल्या असत्या. 
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, सरकारने धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण न देता त्यांंची फसवणूक केली. या फसव्या सरकारविरोधी हल्‍लाबोल आंदोलन  सुरू आहे. सन 2014 मध्ये मोदींनी गुजरात मॉडेल लोकांच्या समारे उभे करून जनतेला फसवले. अच्छे दिनाची स्वप्ने दाखवली. मात्र आता जनता त्यांना भुलणार नाही. 

आमदार जयंत पाटील म्हणाले, बोलका माणूस पंतप्रधान झाला, त्यांनी आश्‍वासने दिली. ती पूर्ण होतील म्हणून जनतेने त्यांना सत्तेवर बसवले. परंतु जनतेची निराशा झाली. जनता   मोदींची लाट  विसरली आहे. जनताच भाजप सरकार सत्तेत ठेवणार नाही हे निश्‍चित. 

माजी आ. मानसिंगराव नाईक म्हणाले, भाजप-शिवसेना सरकारचे दिवस आता भरले आहेत. समाजातील  सर्व घटक सरकारविरोधी झाले आहेत. शिराळा मतदारसंघात आम्ही आमदार असताना जी विकासकामे केली. त्यांची उद्घाटने करण्यात विद्यमान आमदार धन्यता मानत आहेत. विजयराव नलवडे यांनी स्वागत केले. चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी मनोगत व्यक्त केली. आशा झिमूर, रणजित पाटील, देवेंद्र पाटील, पृथ्वीसिंग नाईक, छाया पाटील, सुरेश चव्हाण उपस्थित होते.

मुख्यमंत्री गाईची धार काय काढणार?

धनंजय मुंडे म्हणाले, मुख्यमंत्री म्हणतात, आपण शेतकर्‍याचा मुलगा आहे. गाईची धार काढतो. परंतु त्यांच्याकडे पाहिली की ते शेतकर्‍याचा मुलगा वाटत नाहीत. त्यांना खाली बसता येत नाही तर ते गाईची धार काय काढणार?

अन्यथा शिवाजी केनचे नाव तरी बदला..  

शिवाजी केन कारखान्याने शेतकर्‍यांचे उसाचे पैसे बुडविले. आता कारखानदारांनी आपले शिवाजी नाव बदलावे, अन्यथा उसाचे पैसे तरी द्यावे, असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांना नाव न घेता लगावला.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex