Tue, Jul 14, 2020 06:58होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात 70 टक्के पेरण्या  

कडेगाव तालुक्यात 70 टक्के पेरण्या  

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 8:13PMकडेगाव : रजाअली पिरजादे

कडेगाव तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो.परंतु ताकारी ,टेंभू या सिंचन योजनांमुळे तालुक्याला दिलासा मिळाला आहे.तालुक्याचे एकूण क्षेत्र अठ्ठावन्न हजार हेक्टर क्षेत्र आहे. सत्तावीस हजार सहाशे हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे.त्यामध्ये खरीप पिकांच्या नव्वद टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.पिकांची उगवणही चांगली झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यात मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्‍यांनी  खरिपाच्या पेरण्या लगबगीने उरकून घेतल्या आहेत. सोयाबीन ,संकरित ज्वारी ,मका आणि भुईमूग याकडे  अधिक कल दिसून येतो.विशेषतः सोयाबीन आणि संकरित ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे.सुमारे बारा हजार हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी झाली आहे. तालुक्यात ताकारी ,टेंभू या सिंचन योजना कार्यान्वित झाल्याने त्याचा सर्वाधिक लाभ कडेगाव तालुक्याला झाला आहे.त्यामुळे साहजिक पारंपरिक ऊस पिकाची लागवडही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

अधिकृतरित्या सोळा हजार हेक्टर क्षेत्रात ऊसलागण करण्यात आली आहे.यामध्ये शेतकर्‍यांनी आठ हजार पाच,दहा हजार एक अशा नवीन जातींच्या बियाण्यांचा वापर यावर्षी मोठ्या प्रमाणात केला आहे.त्यामुळे पुढील वर्षी तालुक्यातमोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.उसाबरोबर भाजीपाला आणि फळबाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.सुमारे तीनशे हेक्टर क्षेत्रात भाजीपाला आणि फळबाग करण्यात आली आहे.भाजीपाला आणि फळबागांबरोबर तालुक्यात प्रथमच हळद आणि आले पीकही शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात घेतले आहे.सुमारे दोनशे हेक्टर क्षेत्रात हे पीक घेण्यात आले आहे.

शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ कृषी खात्याकडून मिळवून देण्यात येत आहे.यावर्षी मूग,ज्वारी व मका प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. मागणीनुसार शेतकर्‍यांना शेततळी देण्यात येत आहेत. त्यासाठी सुमारे पंचवीस ते पन्नास हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषि अधिकारी दिलीप होलमुखे यांनी दिली. कृषि खात्याबरोबर तालुका पंचायत समितीच्या वतीने खरीप पिकांची जोरदार तयारी तालुक्यात दिसून येत आहे.सिंचन योजनांचे पाणी ,झालेला पाऊस आणि सर्वच स्तरातून मिळणारी मदत यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले 
आहे.

उन्नत शेतीत   दोनशे  हेक्टर क्षेत्राची निवड 

तालुक्यात उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी या योजनेंतर्गत मुगाचे दोन  ,हायब्रीड ज्वारीचे दोन ,सोयाबीन आंतरपीकाचे तीन आणि मक्याचे सोळा प्रकल्प घेतले आहेत. प्रति प्रकल्प दहा हेक्टर प्रमाणे एकूण दोनशे तीस हेक्टर क्षेत्राची निवड करण्यात आली  आहे. ही माहिती तालुका कृषी अधिकारी  होलमुखे यांनी दिली