Fri, Jul 10, 2020 18:10होमपेज › Sangli › सांगलीत चुरशीने ६५ टक्के मतदान

सांगलीत चुरशीने ६५ टक्के मतदान

Published On: Apr 24 2019 1:41AM | Last Updated: Apr 23 2019 11:37PM
सांगली : प्रतिनिधी

सांगली लोकसभा मतदारसंघात  सर्वत्र चुरशीने सुमारे 65 टक्के मतदान झाले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मतदान सुरू असताना ईव्हीएम  मशीन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. सकाळपासूनच सर्वच मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. दुपारी संथ गतीने मतदान झाले. सायंकाळी चारनंतर मात्र मतदानाचा वेग वाढला होता. 

सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी पक्षाचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. पडळकर यांच्या उमेदवारीमुळे चुरस निर्माण झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या. मंगळवारी या सर्वच उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रात बंद झाले आहे. दि. 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. 

सांगलीसह जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर मतदानाच्या सुरुवातीला तसेच मध्येच ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने, मशीन सुरूच न झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी सकाळी सुमारे तास-दीड तास मतदान ठप्प होते. त्यामुळे नागरिकांना रांगेत प्रतीक्षेत थांबावे लागले;  परंतु मतदान केंद्राच्या अधिकार्‍यांनी मशीन बदलून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरू केली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदारांनी सकाळपासूनच केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. दुपारी एकपर्यंत या रांगा कायम असल्याचे चित्र होते. दुपारी दोननंतर मात्र संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी चारनंतर मात्र मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर पडले. त्यामुळे सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. 

सांगली, मिरज, कुपवाड   शहरासह सहा विधानसभा मतदारसंघांत सकाळपासूनच उत्साहात मतदान सुरू झाले. सांगली, मिरज शहरात चुरशीने   मतदान झाले. ग्रामीण  भागात  सकाळी मतदानाचा वेग काहीसा कमी होता. दुपारनंतर मात्र मतदार केंद्रामध्ये रांगा लागल्या. 12 वाजेपर्यंतच सरासरी 25 ते 30 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या. सांगलीत त्रिकोणी बागेजवळील बालवाडीतील मतदान केंद्रात ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड असल्याची तक्रार नागरिकांनी केली.त्यामुळे सकाळी सुमारे तास-दीड तास मतदान ठप्प होते. नागरिकांना रांगेत प्रतीक्षेत थांबावे लागले. 

काही ठिकाणी अनेकांची नावे मतदार यादीतून गायब झाल्याचे आढळून आले. तसेच मशीन बंद पडली. त्यामुळे मतदान थांबविण्यात आले. याबाबत मतदारांनी तक्रारींचे निरसन झाल्यानंतर मतदान सुरू झाले. सायंकाळी चार वाजल्यानंतर मतदानास मोठा वेग आला. वयोवृध्दांनी मतदानाचा हक्क उत्साहाने बजावला. सायंकाळच्या टप्प्यात मतदान 55 ते 58  टक्क्यांपर्यंत पोहोचले. काही ठिकाणी मतदारांची गर्दी झाल्याने रात्री  सात ते आठ वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

मतदार यादीत नावे नसल्याने घोळ...

दरम्यान, मंगळवारी झालेल्या मतदान प्रक्रियेवेळी अनेक मतदारांची नावेच यादीत नसल्याचे दिसून आले. जिल्हा प्रशासनातर्फे अनेक ठिकाणी मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी मदतीची विशेष सोय केली होती. मात्र, महापालिका निवडणुकीत मतदान केलेल्या अनेकांची नावेच या यादीत नसल्याने हजारो लोकांना मतदान करता आले नाही. शिवाय त्यांना अनेक मतदान केंद्रांवर फिरावे लागले. यादीतच नावे नसल्याने मोठ्या प्रमाणात घोळ झाला होता. त्याचा त्रास मतदारांना झाला. 

सांगली लोकसभा मतदार संघातील मतदान

वर्ष -             टक्केवारी
1998-      59.47
1999-      68.47
2004-      58.41
2009-      52.12
2014-      63.71
2019-      सुमारे 65

रात्री आठपर्यंत मतदान सुरूच

मंगळवारी दिवसभर जिल्ह्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रे बंद पडली होती. तर अनेक ठिकाणी सहा वाजण्यापूर्वी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रात्री सव्वाआठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.