Sun, Nov 18, 2018 17:21



होमपेज › Sangli › कर्जमाफीस 62 हजार शेतकरी अपात्र

कर्जमाफीस 62 हजार शेतकरी अपात्र

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 15 2018 1:58AM



सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत मिसमॅच-1 व मिसमॅच-2 या यादीतील 90 हजार शेतकर्‍यांच्या कर्जमाफी माहितीची तालुकास्तरीय समितीकडून पडताळणी झाली आहे. यात 28 हजार शेतकरी पात्र, तर 62 ंहजार शेतकरी अपात्र ठरत आहेत. दरम्यान, ‘येलोलिस्ट’ आणि मिसमॅच-1 व 2 मधील पात्र शेतकर्‍यांची ‘ग्रीनलिस्ट’ दोन दिवसांत शासनाकडून जाहीर होईल, असे सांगण्यात आले. 

राज्यस्तरावर माहितीचा ताळमेळ न लागलेल्या 91 हजारांवर शेतकर्‍यांची माहिती दोन टप्प्यात (मिसमॅच-1 व 2) जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँकांकडे आली होती. विकास सोसायटी व बँक स्तरावर माहितीची छाननी, लेखापरीक्षकांकडून तपासणीनंतर ही माहिती तालुकास्तरीय समितीकडे गेली होती. तालुकास्तरीय समितीने 90 हजार शेतकर्‍यांच्या माहितीची पडताळणी करून पात्र-अपात्र अंतिम केली आहे. 90 हजार शेतकर्‍यांपैकी 28 हजार शेतकरी कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानास पात्र, तर 62 हजार अपात्र ठरले आहेत. ही यादी शासनाला अपलोड करण्यात आली आहे. दोन दिवसांत ‘ग्रिनलिस्ट’  प्राप्त होईल व संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल, असे सांगण्यात आले. 

अपात्र ठरण्याची कारणे

दि. 1 एप्रिल 2009 ते 31 मार्च 2016 या कालावधीत वाटप झालेल्या कर्जाची दि. 30 जून 2016 पर्यंत थकबाकी राहिली असेल व ती दि. 31 जुलै2017 पर्यंत कायम राहिली असेल तरच ते कर्ज कर्जमाफीस पात्र ठरते. मात्र या कालावधीनंतर थकित राहिलेल्या अनेक शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली होती. ते शेतकरी निकषात बसत नसल्याने अपात्र ठरले आहेत. दि. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2016 या कालावधीत कर्जवाटप झालेल्य कर्जाची वसुली दि. 31 जुलै 2017 पर्यंत झाली असल्यास संबंधित शेतकरी प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरतात. या निकषात न बसणारे शेतकरी अपात्र ठरले आहेत. सन 2009 पूर्वीच्या काही थकबाकीदार शेतकर्‍यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली होती. मात्र निकषात बसत नसल्याने तेही अपात्र ठरले आहेत. 

जिल्हा बँकेकडील ‘ओटीस’साठी 6 हजार 543 शेतकरी पात्र आहेत. या शेतकर्‍यांनी दीड लाखावरील थकबाकीचे 43.76 कोटी रुपये दि. 31 मार्च 2018 या अंतिम मुदतीपर्यंत भरल्यास त्यांना 39.81 कोटींचा लाभ होणार आहे. दरम्यान राष्ट्रीयकृत बँकांकडील मिसमॅच 1 व 2 यादीतील 1586 शेतकर्‍यांची पात्र-अपात्रता अद्याप निश्‍चित व्हायची आहे.