Sun, Jul 05, 2020 16:59होमपेज › Sangli › सांगली : ‘सिव्हिल’मध्ये 430 डॉक्टर तैनात

सांगली : ‘सिव्हिल’मध्ये 430 डॉक्टर तैनात

Published On: Aug 13 2019 11:13AM | Last Updated: Aug 13 2019 11:13AM

file photoसांगली : सचिन लाड

येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालया ( सिव्हील)तर्फे  पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत करण्यात येत आहे. महापुराची परिस्थिती उद्भवल्यापासून सात हजार 206 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. पुराचे पाणी घरात शिरल्याने दाखल असलेले सातशे रूग्ण अडकून पडले. 

सांगलीत दि. 4 ऑगस्टपासून पुराचे पाणी शिरण्यास सुरुवात झाली. पाऊस थांबत नव्हता. कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत होती. पूरग्रस्तांना मदतीसाठी अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दि. 5 ऑगस्टपासून 24 तास बाह्यरूग्ण (ओपीडी) विभाग सुरू केला. यासाठी सांगली आणि मिरज रुग्णालयातील 430 डॉक्टरांचे  पथक तैनात केले. अधिकारी व कर्मचार्‍यांच्या साप्ताहिक सुटट्या व रजा बंद केल्या. मिरजेतील रुग्णसेवेत खंड  पडू नये, यासाठी तिथे बाहेरील जिल्ह्यातील 180 डॉक्टर बोलावून घेण्यात आले आहेत. 

रक्तदाब, मधुमेह, दमा, ताप, सर्दी व खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत. अनेक रुग्णांना घरात पाणी शिरल्याचा धक्का बसला होता. त्यांच्यावर औषधोपचार करण्याबरोबर मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याचे काम वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुबोध उगाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांतील डॉक्टर्सही वैद्यकीय उपचारांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी काम करीत आहेत.

पूरग्रस्तांसाठी दोनशे जणांसाठी वॉर्ड सुरू केला होता. तिथे या रुग्णांचे घरच्या काळजीमुळे मानसिक संतूलन बिघडू लागले. यासाठी प्रशासनाने या सर्वांना जनरल वॉर्डामध्ये दाखल केले. याठिकाणी अन्य रुग्णांमध्ये ते सामील झाल्याने त्यांच्यात थोडी सुधारणा झाली. 

पूरपरिस्थतीमुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला होता. प्रशासनाच्या तीन कूपनलिका आहे. त्याचे पाणी खर्चासाठी घेतले. पिण्यासाठी शुद्धीकरण यंत्र उपलब्ध केले. कूपनलिकेचे पाणी शुद्धीकरण करून ते रुग्णांना पिण्यासाठी दिले.

महापूर येण्यापूर्वी शहर परिसर, वाळवा, शिराळा, पलूस, मिरज तसेच कोल्हापूर, सातारा व कर्नाकातील सातशे रुग्ण उपचार घेत होते. पूर आल्यामुळे या रुग्णांना डिस्चार्ज मिळाला; परंतु त्यांना घरी जाता आले नाही. या रुग्णांसह  नव्याने दाखल झालेले पूरग्रस्त रुग्ण व त्यांचे नातेवाईक या सर्वांच्या चहा, नाष्टा व जेवणाची सोय  रुग्णालय प्रशासनानेच केली. उपचारांबरोबर त्यांचे पालनपोषण व धीर देण्याची जबाबदारी प्रशासन सांभाळते आहे. पूर ओसरत असल्याने सोमवारी शंभर रुग्णांना डिस्चार्ज दिला असल्याचे डॉ.  उगाणे यांनी सांगितले. 

    सांगलीत 430, मिरजेत 180 डॉक्टर

    पुरग्रस्त 7 हजर 206 रुग्णांची तपासणी

    862 रुग्णांना दाखल करून उपचार 

    61 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया 

    सांगलीत विविध ठिकाणी 38 शिबिरे

पिठाची चक्कीच केली खरेदी

रुग्णांना चहा, जेवणाची सोय आहे. मात्र पुरामुळे शहरात  पिठाच्या अनेक गिरण्या बंद झाल्या आहेत. रुग्णांच्या जेवणाचा प्रश्‍न गंभीर बनला. धान्य होते. पण ते दळण्यासाठी गिरणी ( चक्की) नव्हती. त्यामुळे प्रशासनाने चक्कीच खरेदी केली.  रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची सोय झाली.