Wed, Jul 08, 2020 16:32होमपेज › Sangli › आटपाडी तालुक्यात आरोग्य कर्मचार्‍यांची 34 पदे रिक्‍त

आटपाडी तालुक्यात आरोग्य कर्मचार्‍यांची 34 पदे रिक्‍त

Published On: May 15 2018 1:34AM | Last Updated: May 15 2018 1:34AMआटपाडी : लतिफ मुलाणी

आटपाडी तालुक्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रे व एक ग्रामीण रुग्णालय आहे. यातून रुग्णांना मोफत औषधपचार करण्यात येतात. मात्र तालुक्यात आरोग्य विभागात  34 पदे रिक्‍त आहेत. त्याचा रुग्णांना पूर्णवेळ वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी फटका बसू लागला आहे.  आटपाडी तालुक्यात आटपाडी, दिघंची, करगणी, खरसुंडी ही  प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. आटपाडी येथे एक ग्रामीण रुग्णालय आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत अठरा उपकेंद्राचा समावेश होतो. या तालुक्यात 121 कर्मचारी संख्या मंजूर आहे.त्यापैकी पैकी 87 कार्यरत आहेत तर 34 पदे रिक्‍त आहेत.

रिक्त पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी - 4, औषध निर्माण अधिकारी - 1, आरोग्य सहाय्यक -3, आरोग्य सहाय्यक महिला - 3, प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 3, आरोग्य सेवक - 2, आरोग्य सेवक पुरूष (मलेरिया) - 1, आरोग्य सेविका महिला - 8, कनिष्ठ सहाय्यक -1, परिचर-3, स्वीपर-3, अर्धवेळ स्त्री परिचर-2 अशी 34 पदे रिक्त आहेत.

तालुक्यात चारही प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्‍यांचे प्रत्येकी एक पद रिक्‍त असल्याने रुग्णांना पूर्णवेळ सेवा मिळत नाही. परिणामी रुग्णांना महागड्या खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तालुक्यात शासकीय दवाखाने असूनही रुग्ण खासगी रुणालयात जाण्याचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही. याचा संबंधितांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.जांभुळणी येथे नवीन उपकेंद्र उभारण्यात आले आहे. ते अद्याप सुरू झालेले नाही.  झरे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झाल्यास खरसुंडी प्राथमिक आरोग्य केंद्रावरील ताण कमी होणार आहे. खरसुंडी येथे वर्षातून दोन मोठ्या यात्रा भरतात. त्यामुळे  खरसुंडी येथे सुसज्ज ग्रामीण रुग्णालय उभारण्याची गरज आहे.

नेलकरंजीतील आयुर्वेदिक दवाखान्याची दुरवस्था झालेली आहे. या दवाखान्यात काही वर्षांपासून डॉक्टरांची नेमणूकच  करण्यात आलेली नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांसह रुग्णांना खासगी दवाखान्यात उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.