Tue, Jul 14, 2020 05:39होमपेज › Sangli › बँक कर्मचार्‍यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लुटली

बँक कर्मचार्‍यांच्या डोळ्यात चटणी टाकून २५ लाखांची रोकड लुटली

Published On: Jun 14 2019 2:58PM | Last Updated: Jun 14 2019 3:13PM
तासगाव : शहर प्रतिनिधी

विसापूर रस्त्यावर खानापूर फाट्यापासून काही अंतरावर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेची तब्बल 25 लाखाची रोकड चार अज्ञात चोरट्यांनी लुटली. विसापूर शाखेतील बँक कर्मचाऱ्यांचा पाठलाग करून त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून मारहाण करीत चोरट्यानी हे कृत्य केले. शुक्रवारी सकाळी साडे अकाराच्या सुमारास हा प्रकार घडला. भरदिवसा प्रमुख रस्त्यावर झालेल्या या प्रकारामुळे तासगाव शहरात मोठी खळबळ उडाली. 

दरम्यान, रक्कम चोरल्यानंतर चोरटे ढवळी (ता. तासगाव) च्या दिशेने पळून गेल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. विविध भागात पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे (एलसीबी) अधिकारी, कर्मचारी तासगावात दाखल झाले आहेत.

याबाबत प्राथमिक माहिती अशी : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विसापूर शाखेचे दोन कर्मचारी दुचाकीवरून तासगाव येथील मार्केट यार्ड शाखेत पैसे नेण्यासाठी आले होते. तासगाव शाखेतून या कर्मचाऱ्यांनी 25 लाखांची रोकड घेतली. ही रोकड बॅगमध्ये घेऊन दोघेजण दुचाकीवरून विसापूरकडे निघाले होते.

दरम्यान, बँकेतून बाहेर पडल्यापासून चोरटे या दोघांच्या पाळतीवर असल्याची चर्चा सुरू होती. बँकेचे कर्मचारी तासगावातून विसापुरकडे जात असताना चोरट्यानी दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. दोन दुचाकीवरून चौघा चोरट्यानी पाठलाग करून तासगाव - विसापूर रस्त्यावरील खानापूर फाट्यापासून काही अंतरावर या कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. त्यांच्या डोळ्यात चटणी फेकली. त्यांना मारहाण केली. त्यांच्या हातातील 25 लाख रुपये रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. यानंतर अवघ्या काही मिनिटात चोरटे ढवळीच्या दिशेने पसार झाले.

पोलिस दीड तासांनी घटनास्थळी हजर

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर तब्बल दीड तासांनी तासगाव पोलिस घटनास्थळी हजर झाले, त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक तासगावात दाखल झाले आहे. या घटनेनेनंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.