Sat, Jul 04, 2020 05:58होमपेज › Sangli › बनावट सोने देऊन १५ लाखांची फसवणूक : चौघांवर गुन्हा दाखल

बनावट सोने देऊन १५ लाखांची फसवणूक : चौघांवर गुन्हा दाखल

Published On: Sep 05 2019 1:43AM | Last Updated: Sep 04 2019 11:59PM
विटा : वार्ताहर 
येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील हंगामी सफाई कामगाराने कर्जासाठी नातेवाइकांच्या नावे  बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवून बँकेची 14 लाख 85 हजार 982 रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत विटा पोलिसांत शाखाधिकारी विवेककुमार पारसनाथ सिंह  यांनी फिर्याद दिली आहे.  

श्रीकांत सुरेश गोंजारी, त्याची पत्नी स्नेहल व चुलतभाऊ संतोष विलास गोंजारी (सर्व रा. विटा) व सराफ व्यावसायिक गणेश दत्तात्रय बाबर (रा. वाळूज, ता. खानापूर) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी  ः विटा येथील श्रीकांत गोंजारी बँकेत  दि.29 ऑक्टोबर 2007 पासून सफाई कामगार म्हणून काम करीत होता. बँकेने त्याच्याकडे विश्‍वासाने बँकेतील सोन्याचे दागिन्यांचे व्हॅल्युएशन करण्याचे काम सोपवले होते. त्याचा गैरफायदा घेऊन त्याने  दि. 18 मार्च 2014 ला स्वत:च्या नावे 95 हजारांचे सोने गहाण कर्ज घेतले. कर्जप्रकरणाचे दि. 29 जून 2017 ला नूतनीकरण करून पुन्हा 90 हजार रूपये घेतले. त्याने पुन्हा दि. 27 मार्च 2014 रोजी 1 लाख 45 हजारांचे सोने गहाण कर्ज घेतले. दि.29 जून 2017 ला कर्जप्रकरणाचे नुतनीकरण करून 1 लाख तीस हजार रूपये घेतले. 

या कर्जाशिवाय पत्नी स्नेहलच्या नावे दि.28 मे 2014 ला 1 लाख 70 हजार सोने तारण कर्ज घेतले. त्या  कर्जाचे दि.28 सप्टेंबर 2014 ला नुतनीकरण करून दीड लाख रूपये घेतले. त्यानंतर पत्नीच्या नावे आणखी  2 लाख 90 हजारांचे सोने गहाण कर्ज घेतले. 

दि.27  फेब्रुवारी 2015 ला श्रीकांत याने त्याचा चुलतभाऊ संतोष गोंजारी याच्या नावे 2 लाख रूपये सोने गहाण कर्ज घेतले. दि. 27 ऑक्टोंबर 2015 ला दुसरे 2 लाख 36 हजार रूपयांचे सोने तारण कर्ज घेतले. 

तिघांची  एकूण सहा कर्ज प्रकरणे करून 10 लाख 96 हजार रूपये सोने गहाण कर्ज घेतले आहे. या कर्जप्रकरणासाठी बँकेचे सोने व्हॅल्युएटर म्हणून काम पाहणारे ओम शिवम टंचचे गणेश बाबर याच्याशी गोंजारी याने संगनमत केले. त्याने दागिन्यांचे वजन आणि खोटे शुध्दता प्रमाणपत्र दिले. 

गोंजारी ऑक्टोंबर 2015 ला बँकेतील काम सोडून गेला. त्याचे कर्ज प्रकरण थकित होते. त्यामुळे त्याला बँकेने वेळोवेळी सोने सोडवून घेण्याबाबत कळविले. परंतु तो आला नाही. बँकेच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयामार्फत तारण  दागिन्यांचा लिलाव करण्यात आला.  टेस्टींगमध्ये ते सोने बनावट असल्याचे आढळून आले. 

बँकेची दि. 31 जुलै 2019 पर्यंत कर्जदार गोंजारी याच्याकडून येणारी सर्व रक्कम, त्याचे व्याज अशी 14 लाख 85 हजार 982 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.