होमपेज › Sangli › जिल्ह्यातील ११२ गुंड कळंबा, येरवड्यात

जिल्ह्यातील ११२ गुंड कळंबा, येरवड्यात

Published On: Jul 05 2019 1:34AM | Last Updated: Jul 04 2019 11:26PM
सांगली : सचिन लाड

खून, खुनाचा प्रयत्न, अशा विविध विविध गुन्ह्यांत अटकेत असलेल्या जिल्ह्यातील 112 गुंडांना पुण्यातील येरवडा व कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवण्यात आले आहे.  बुधवारी गुंड म्हमद्या नदाफ याच्यावर झालेल्या खुनी हल्ल्यामुळे कारागृहातील सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एखदा ऐरणीवर आला आहे. 

सांगलीत राजवाडा चौकातील कारागृहाची क्षमता 235 कैदी ठेवता येतील अशी आहे. गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढलेला आलेख वाढतो आहे. खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी या गुन्ह्यांची नेहमीच मालिका सुरू राहिली आहे.  बलात्कार, विनयभंग, अल्पवयीन मुलींच्या अपरहरणाच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे. यातून दररोज किमान सहा ते सात   गुन्हेगारांची कारागृहात रवानगी होत आहे. त्यामुळे जिल्हा कारागृहामधील कैद्यांची संख्या चारशेवर गेली आहे. कैद्यांना झोपायला जागा नाही, अशी परिस्थिती आहे.

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी गेल्या दीड वर्षांत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या (मोक्का) तर्गत दहा टोळ्यांना कारवाईचा दणका दिला आहे. या टोळ्यांतील 53 गुन्हेगारांना अटक केली आहे. याशिवाय टोळीयुद्धातून वर्षभरात भरदिवसा तिघांचा खून झाला. ‘खून का बदला खून’, असे म्हणत  विरोधी  टोळीतील गुन्हेगारांचा खून  करण्यात आला. यातून 56 संशयितांना अटक झाली. 
सांगलीच्या कारागृहात कैद्यांची वाढलेली संख्या आणि सुरक्षा या दोन गोष्टींचा विचार करुन कारागृह प्रशासनाने ‘मोक्का’ व खुनाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या टोळ्यांना येथे दाखल करुन घेण्यास नकार दिला. प्रशासनाने न्यायालयास तशी विनंतीही केली. न्यायालयाने ती विनंती मान्य करुन मोक्का व  खुनातील गुुन्हेगारांना कळंबा व येरवडा येथील कारागृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील 112 गुन्हेगारांची या दोन कारागृहांत रवानगी करण्यात आली. तिथेही गुन्हेगारांनी   दबदबा व दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हमद्या नदाफवर झालेल्या हल्ल्यामुळे स्पष्ट होते. 

सांगलीच्या कारागृहात यापूर्वी कैद्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली आहे.  पूर्वीचा अनुभव  असल्याने कारागृह प्रशासनाकडून प्रतिस्पर्धी तसेच गंभीर गुन्ह्यातील टोळ्यांना येथे दाखल करुन नकार दिला जातो. कैद्यांच्या तुलनेत कर्मचार्‍यांची संख्या अत्यंत अपुरी आहे. सुरक्षेचा भार पेलताना प्रशासनाला दररोज तारेवरची कसरत करावी लागते. अर्थात जिल्ह्यातील 112 ग़ुन्हेगारांना येरवडा व कळंबामध्ये ठेवल्याने तेथील यंत्रणेवरही प्रचंड ताण  वाढला आहे. 

‘सबजेल’ सुरु करण्याची गरज

जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. सुरक्षा अणि क्षमतेमुळे 112 गुन्हेगारांना कळंबा व येरवड्याला हलवावे लागले. गुन्हेगारीचे प्रमाण वाढत  असल्याने गुन्हेगारांची संख्याही वाढते आहे. यासाठी तालुकास्तरावर उपकारागृहे ( सबजेल) सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.