Tue, Jul 14, 2020 03:19होमपेज › Sangli › ‘टेंभू’चा नेवरीसह ११ गावांना दिलासा

‘टेंभू’चा नेवरीसह ११ गावांना दिलासा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कडेगाव : संदीप पाटील

टेंभू योजनेमुळे नेवरी भागातील 11 गावांना दिलासा मिळाला आहे. या पाण्यामुळे या भागातील 4 हजार 48 हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येणार आहे. तर अनेक दिवसांची तहान भागणार असल्याने या भागातील शेतकरी प्रथमच खुशीत दिसू लागला आहे.

टेंभू योजनेच्या पाण्यापासून  वंचित असणार्‍या कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडियेरायबाग, शेळकबाव, कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी यांसह खानापूर तालुक्यातील गार्डी, घानवड यासह अन्य गावांना आता पाणी मिळणार आहे.

या पाण्यापासून वंचित गावांसाठी  माहुली (ता. खानापूर) येथील टेंभू योजनेच्या टप्पा क्र. 3 मधून बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी मिळणार आहे. नाबार्डच्या माध्यमातून यासाठी 40 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यामुळे आता कडेगाव व खानापूर तालुक्यातील सुमारे 4 हजार 48 हे. क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

कडेगाव तालुक्याच्या पूर्वेला असणार्‍या या गावात सध्या हजारो एकर ओसाड माळरान आहे. या योजनेमुळे हे माळरान आता ओलिताखाली येणार आहे. तर यामुळे या 12 गावांचा दुष्काळ हटण्यास मदत होणार आहे. या भागातील शेतकर्‍यांनी वेळोवेळी पाण्यापासाठी मोठा संघर्ष केला आहे. काही गावांनी तर निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला होता.

जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा करून या योजनेसाठी नाबार्डकडून 40 कोटी रुपये मंजूर करून आणले. निधी मंजूर झाल्याने हे काम लवकरात लवकर सुरू होणार आहे. बंदिस्त पाईपलाईनद्वारे शेतीला पाणी देण्यासाठीचा जिल्ह्यात तसेच तालुक्यात हा पहिलाच प्रयोग ठरणार आहे. काही दिवसात या कामाला सुरुवात होणार असल्याने या भागातील शेतकर्‍यांतून याचे स्वागत होत आहे.

 

Tags : sangli, Kadegaon news, Newari, villages, water,


  •