Thu, Jul 02, 2020 10:30होमपेज › Sangli › ‘मी आत्महत्या करणार नाही, तर लढणार’

‘मी आत्महत्या करणार नाही, तर लढणार’

Published On: Apr 14 2018 1:41AM | Last Updated: Apr 14 2018 12:21AMसांगली : प्रतिनिधी 

राज्यातील शेतकर्‍यांच्या  आत्महत्या थांबविण्यासाठी दि. 1 मे पासून स्वाभिमानी शेतकरी संघटना ‘मी आत्महत्या करणार नाही तर लढणार’ या अभियानाला सुरुवात करणार आहे, अशी माहिती  संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक दोन दिवस देहू  येथे पार पडली. या  बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देताना  शेट्टी म्हणाले,  मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील गावापासून अभियानाला सुरूवात केली जाणार आहे. राज्यातील 11 जिल्ह्यात हे अभियान राबविले जाणार आहे. दि. 9 मे रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात या अभियामाची  सांगता होईल. गावोगावी जाऊन शेतकर्‍यांना विश्वासात घेतले जाईल.कर्जबाजारीपणाला शेतकरी जबाबदार नाही तर शासनाचे चुकीचे धोरण जबाबदार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आत्महत्या करून नये, असे आवाहन या अभियानातून करण्यात येईल.

ते पुढे म्हणाले, खासगी सावकारासह  शेतकर्‍यांचे सर्व कर्ज एकरकमी माफ करून सात-बारा कोरा करावा. तसेच शेतकर्‍यांना दीडपट हमीभाव मिळावा यासाठी येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनावेळी दोन विधेयके  मी  संसदेत सादर करणार आहे. त्यास देशातील 32 हून अधिक विरोधी पक्षांच्या नेत्यांनी व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्याचप्रमाणे येत्या 1 मे रोजी होणार्‍या गावसभेत या विधेयकांना पाठिंबा देण्याचे ठराव केले  जाणार आहेत. हे ठराव  लोकसभा व राज्यसभेच्या सभापतीना पाठविले जाणार आहेत. 

 दि. 10 मे रोजी  1857  स्वातंत्र्ययुद्धाला 161 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने किसान सभेतर्फे राबविल्या जाणार्‍या अभियानाचा भाग म्हणून हजारो शेतकर्‍यांच्या सह्या घेतल्या जातील.  या सह्यांचे निवेदन लोकसभेत सादर करुन शेतकरी कर्जमाफी व  हमीभाव विषयक मांडल्या जाणार्‍या विधेयकास मंजुरी मिळावी, यासाठी दबाव टाकणार आहे, असेही त्यांनी सांगितले. 


Tags : will not commit suicide,  will fight,sangli news