Fri, Sep 20, 2019 21:57होमपेज › Sangli › दुर्गा ओळखण्यासाठीच ‘मी सक्षमा’ व्यासपीठ

दुर्गा ओळखण्यासाठीच ‘मी सक्षमा’ व्यासपीठ

Published On: Jan 22 2019 1:34AM | Last Updated: Jan 22 2019 1:34AM
सांगली : प्रतिनिधी

प्रत्येक महिलेमध्ये प्रचंड ताकद असूनही ती त्याचा वापर फक्त अन्याय सहन करण्यासाठी करते. मुलींनी स्वतःमधील दुर्गा, इंदिरा, प्रियदर्शनी ओळखावी यासाठी युवा नेते विशाल पाटील यांनी ‘मी सक्षमा’चे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठीचा पुरेपूर फायदा घेत युवती, महिलांनी पुढे यावे, असे प्रतिपादन आमदार प्रणिती शिंदे यांनी केले. काँग्रेसचे युवक नेते, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी मालती फौंडेशनच्या माध्यमातून युवती, महिलांसाठी ‘मी सक्षमा’ उपक्रम सुरू केला आहे. त्याच्या उद्घाटनावेळी आमदार शिंदे बोलत होत्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, युवक नेते धीरज देशमुख उपस्थित होते. 

आमदार शिंदे यांच्याहस्ते ‘मी सक्षमा’च्या कोअर कमिटीतील महिलांकडे मशाल देऊन आगळ्या पद्धतीने या उपक्रमाचे उदघाटन करण्यात आले.  आमदार शिंदे म्हणाल्या,  महिला, युवतींच्या सक्षमीकरणासाठी युवा नेते विशाल पाटील यांनी पाऊल उचलले आहे. त्याला सांगली जिल्ह्यातील युवतींनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. घरातील गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना मुलींच्याहस्ते झाली तरच बदल घडेल. जेवणाच्या पंगतीत महिलांना अगोदर स्थान दिल्यास परिवर्तनाची सुरुवात होईल. सांगलीत सुरू झालेले मी सक्षमा हे व्यासपीठ राजकीय नसून ते सामाजिक सांस्कृतीक व्यासपीठ आहे असेही आमदार शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. 

सत्यजित तांबे म्हणाले,  राज्यातील अनेक युवती मेळावे मी पाहिले आहेत. पण युवतींमध्ये सर्वाधिक जोश सांगलीतच पहायला मिळाला. युवक नेते धीरज देशमुख म्हणाले, ‘मी सक्षमा’च्या निमित्ताने सांगलीतील युवतींनी दाखवलेला जोश, उर्जा कायम ठेवावी. महिलांचे खरच सक्षमीकरण करायचे असेल तर मुलींना घरात जी बंधने घातली जातात ती प्रत्यक्षात मुलांना घातली पाहिजेत. मुलींना जे संस्कार दिले जातात तेच संस्कार मुलांना द्यायला हवेत. त्यानंतरच खर्‍या अर्थाने मुली सुरक्षित होती. मुलगा, मुलगी भेदभाव न करता पालक ज्यावेळी वागतील तेव्हाच खर्‍या अर्थाने मुलींना सक्षमतेचा अनुभव येईल. 

स्वागत व प्रास्ताविक करताना विशाल पाटील म्हणाले, इतिहासात न डोकावता सध्या आपण पाहिले तर अनेक यशस्वी लोकांनी युवा असतानाच मोठे यश मिळवले आहे. त्यामुळे युवतींनी आतापासूनच सक्षम व्हायला हवे. गेल्या साडेचार वर्षात 1 कोटी दहा लाख लोकांना नोकर्‍या गमवाव्या लागल्या. यामध्ये 88 लाख महिलांचा समावेश आहे. महिलांना सुरक्षा देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी, त्यांच्यातील नेतृत्वासह   जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यातून हजारो युवती, महिला उपस्थित होत्या. मोनिका करंदीकर यांनी सूत्रसंचलन केले. विशाल पाटील आमदार झाले तर रितेशही येईल धीरज देशमुख यांनी बंधू रितेश देशमुख याच्या चित्रपटातील संवाद म्हणत उपस्थितांशी चर्चा केली.   देशमुख यांनी ‘विशाल पाटील यांना आमदार करा रितेशला सांगलीत आणण्याची जबाबदारी माझी’ असे म्हणताच टाळ्यांचा गडगडाट झाला. 

तीन मुख्यमंत्र्यांचे वारसदार व्यासपीठावर

तीन माजी मुख्यमंत्र्यांचे वारसदार या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री वसंतदादा यांचे नातू विशाल पाटील, विलासराव देशमुख यांचे सुपुत्र धीरज देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. या तीनही मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याची आठवणही उपस्थितांना करून दिली. 

बुलेट सारथ्याचे कौतुक

मेळाव्यापूर्वी शहरातील प्रमुख मार्गावरून युवतींनी मोटारसायकल रॅली काढली. महिला सारथ्य करत असलेल्या बुलेटवर विशाल पाटील, धीरज देशमुख स्वार झाले होते. त्यानंतर कार्यक्रमात बोलताना देशमुख यांनी बुलेटचे सारथ्य करणार्‍या युवतींचे कौतुक केले. भाजपच्या शासनकाळात रस्त्यावरील खड्ड्यातून चांगले सारथ्य केल्याबद्दल युवतीचे त्यांनी आभारही मानले.