Sun, Jul 05, 2020 15:24होमपेज › Sangli › सातबारा ऑनलाईनचा घोळ सुरूच : नोंदी रखडल्या

सातबारा ऑनलाईनचा घोळ सुरूच : नोंदी रखडल्या

Published On: May 12 2018 1:36AM | Last Updated: May 11 2018 10:58PMदेवराष्ट्रे : विठ्ठल भोसले

डिजिटल स्वाक्षरीसह  7/12 उतारा  ऑनलाईन देण्याचे शासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.   त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. तरीही सातबारा ऑनलाईनचा गोंधळ  संपेल असे दिसत नाही.
शासन स्तरावरून वरिष्ठ अधिकार्‍यांवर काम लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव आहे. त्यामुळे  अधिकारी तलाठ्यांच्या मागे लागले आहेत. परिणामी तलाठ्यांची चांगलीच दमछाक झाली आहे. ऑनलाईनच्या कामामुळे हजारो नोंदी रखडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी मात्र चांगलेच त्रस्त झाले आहेत.

सातबारा उतारा ऑनलाईन करण्याची मोहीम राज्य शासनाच्यावतीने सुरू आहे. प्रत्यक्षात सन 2004 पासूनच महसूल खाते जमिनी संदर्भात लागणारे दस्तावेज ऑनलाईन करण्याचे प्रयत्न करीत आहे. सन 2004-05 मध्ये एनआयसीने जो नमुना (फॉरमॅट) करून दिला होता त्यानुसार त्यावेळी ऑनलाईन सातबारा भरण्यात आले.परंतु त्या सातबारा उतार्‍यांमध्ये त्रुटी निर्माण झाल्या. आता सातबारा उतारे ऑनलाईन करण्यात आले आहेत,  पण त्यातील त्रुटींचा घोळ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी सात बारा उतार्‍याचे चावडी वाचन झाले.त्यानंतर काहीच दिवसांत नवीन सॉफ्टवेअर आले. त्याआधारे सात बारा उतार्‍याच्या नोंदी बिनचूक करण्याचे काम सुरू आहे.  मात्र सात बारा अचूक केल्यानंतरही संगणकावर तो कोरा दिसत असल्याने तलाठी हताश झाले होते. त्यामुळे पुन्हा सॉफ्टवेअरमध्ये बदल करून 7/12 ऑनलाईन करण्याचे काम सुरू करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केल्याप्रमाणे दि. 1 मे पासून तरी 7/12 डिजिटल स्वाक्षरीनुसार एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. मात्र जिल्ह्यातील बहुसंख्य गावांत  7/12 ऑनलाईनचे काम पूर्ण झाल्याचे दिसत नाही. काही गावांत ते पूर्ण झाले आहे. त्या उतार्‍यांची तपासणी सुरू आहे. त्यामुळे 7/12 ऑनलाईनचा घोळ संपता संपेना असेच दिसत आहे.

सातबारा ऑनलाईन करण्याच्या धावपळीत इतर हजारो नोंदी रखडल्या आहेत. यामध्ये खरेदी दस्त, बोजा चढवणे, विहीर, कूपनलिका यासारख्या हजारो नोंदी रखडल्या आहेत. या नोंदी घालण्यासाठी तलाठ्यांकडून तारखा दिल्या जात आहेत. मात्र सात बारा ऑनलाईनच्या कामाचाच भार पेलवत नसल्याने तलाठीही त्रस्त झाले आहेत.  शेतकरीही तलाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे घालून मेटाकुटीला आले आहेत.

सातबारा उतारा ऑनलाईन करण्यासाठी  तलाठ्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. शासनाकडून अशा प्रकारे योग्य प्रशिक्षण दिले गेले नसल्याने मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत.

ऑनलाईनची तारीख पे तारीख

सात बारा ऑनलाईनच्या कामामध्ये दिरंगाई होत असल्याने शासनाने हे काम पूर्ण करण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या तारखांची घोषणा केली आहे.मात्र तरीही काम पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे शासनाकडून केवळ तारीख पे तारीख असाच सिलसिला  सुरू आहे.