Tue, Jul 14, 2020 00:34होमपेज › Sangli › नाट्यगृह जागेवरून भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली 

नाट्यगृह जागेवरून भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली 

Published On: Nov 17 2018 1:22AM | Last Updated: Nov 16 2018 11:09PMसांगली : प्रतिनिधी

नेमिनाथनगरमधील भूखंडावरील प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण उठवून तिथे नाट्यगृहाचे आरक्षण ठेवण्यावरून शुक्रवारी महासभा गाजली.  या विषयावरून भाजप काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत चांगलीच खडाजंगी झाली.

काँग्रेसचे संतोष पाटील म्हणाले, भाजपने सुपारी घेतली आहे. आरक्षण हटवून हा भूखंड मूळ जागा मालकाच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.  भाजपचे नेते शेखर इनामदार यांनी पलटवार केला. ते म्हणाले, आम्हाला जागेत रस नाही, शहराच्या विकासात आहे. ज्यांनी पालिकेवर दरोडा टाकला त्यांना लोकांनी सत्तेतून बाहेर काढले आहे. या जागेत कायदेशीर अडणचणी असतील तर अन्य जागेवर नाट्यगृह उभारू. अखेर महापौर संगीता खोत यांनी प्रशासनाला हा विषय स्थगित ठेवा आणि पुढील सभेत अहवाल सादर करा असे  आदेश दिले.  मुख्यमंत्र्यांनी मनपाला जाहीर केलेल्या शंभर कोटींच्या विशेष अनुदानातून नेमिनाथनगर येथे अद्यावत व सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 15 कोटी खर्च होणार आहेत. कल्पद्रम क्रीडांगणाजवळील भूखंडावर हे नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. मात्र या जागेवर प्राथमिक शाळा व क्रीडांगणांचे आरक्षण आहे. 

नगरसेवक मंगेश चव्हाण म्हणाले. क्रीडांगणाचे आरक्षण उठविता येत नाही. तरी भाजपचा रेटून बेकायदा कारभार सुरू आहे. राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान म्हणाले, सांगली नाट्यपंढरी आहे. शहरासाठी सुसज्ज नाट्यगृह झाले पाहिजे. त्याला आमचा विरोध नाही. पण जेथे हे उभारायचे आहे त्या भूखंडाच्या मूळ मालकानेच्यावतीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या जागेचा वाद न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे महासभेला निर्णय घेता येणार नाही, यावर चर्चाही करता येणार नाही. मंगेश चव्हाण यांनी शासन आदेशानुसार क्रीडांगणाचे आरक्षण उठवता येत नाही असे  सांगितले. अधिकार्‍यांनी खुलासा करावा अशी मागणी केली. नगररचनाकार पेंडसे यांनी या जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याबद्दल प्रशासनाला माहिती नसल्याचे सांगितले. 

या जागेवर प्राथमिक शाळा व क्रीडांगण असे आरक्षण आहे. हे क्रीडांगण शाळेसाठीचे असल्याचे सांगीतले. याला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी विरोध केला. चव्हाण म्हणाले, अधिकारी महासभेची दिशाभूल करीत आहेत. तर बागवान यांनी हा विषय न्याय प्रविष्ट असल्यानेच वकिलांनी नोटीस बजावल्याचे सांगितले. संतोष पाटील म्हणाले, सांगली नाट्यपंढरी आहे. त्यामुळे येथे सुसज्ज, अत्याधुनिक नाट्गृह उभारले तर आमचा त्याला पाठिंबाच आहे. मात्र नेमिनाथ नगरमधील ज्या जागेवर हे नाट्यगृह प्रस्तावित आहे तेथील आरक्षण उठवणे बेकायदेशीर आहे.  ही जागा खासगी मालकीची आहे. मूळ जागा मालक पवार यांनी याप्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाटील म्हणाले,  विकास आराखड्यात ठेवलेले आरक्षण  बदलले तर मूळ मालकाकडे ही जागा परत जाईल. तो यासाठी न्यायालयात दाद मागू शकतो. यापूर्वी अशा प्रकारे आरक्षणात बदल केलेल्या काही आरक्षित जागा केवळ त्यांचा वापर बदलण्यात आल्याने धोक्यात आल्या आहेत. ही मोक्याची जागा नाट्यगृहाच्या नावाखाली आरक्षण बदलून मूळ मालकाच्या घशात घालण्याचा डाव आहे. याची सुपारी भाजप व प्रशासनाने घेतली आहे का? 

यावर  शेखर इनामदार आक्रमक झाले. ते म्हणाले, या जागेवरील आरक्षण उठवण्यासाठी भाजपने सुपारी घेतल्याचा आरोप खोटा आहे. सुपारी घेण्याचा आमचा धंदा नाही. ती कोण घेते  हे जनतेला माहीत आहे. आम्ही शहरात चांगले, आधुनिक नाट्यगृह व्हावे यासाठी आम्ही हा निर्णय घेतला.  महापालिकेत पारदर्शी कारभाराचे आश्‍वासन आम्ही जनतेला दिले आहे. ते शेवटपर्यंत पाळणार आहोत. पालिकेवर कोणी दरोडा टाकला, कोणी सुपार्‍या घेतला ते जनतेला माहित आहे. म्हणूनच अशा लोकांना हटवून आम्हाला सत्ता दिली आहे. इनामदार म्हणाले, नेमिनाथनगर येथील जागेचा विषय न्यायप्रविष्ट आहे. तसेच  आरक्षण उठवण्यात कायदेशीर, तांत्रिक अचडणी असल्याचे प्रशासनाने आमच्या निर्दर्शनास आणले नाही. ही प्रशासनाची चूक आहे. त्यांच्यामुळे सत्ताधार्‍यांना बदनाम व्हावे लागत आहे.  हीच जागा नाट्यगृहासाठी हवी असा भाजपचा आग्रह नाही. शहरातील कोणतीही योग्य जागा विरोधकांनी सुचवावी त्याचाही विचार केला जाईल. तसेच नेमिनाथ नगरमधील जागेबाबत अहवाल प्रशासनाने पुढील सभेत आणावा. तोपर्यंत हा विषय स्थगित ठेवावा. महापौर संगीता खोत यांनी नेमिनाथनगरमधील जागेबाबबत कायदेशीर व तांत्रिक महिती घेऊन तसेच अन्य पर्यायी जागांचा नाट्यगृहासाठी विचार करून त्याबाबत पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनास दिले. तोपर्यंत आरक्षण उठवण्याचा विषय स्थगित ठेवला.

नाट्यगृहासाठी हनुमाननगरातील जागेचा पर्याय

माजी महापौर हारूण शिकलगार यांनी कोल्हापूर येथील पालिकेची दोन एकर जागा सुचवली.  दिग्विजय सूर्यवंशी, अभिजित भोसले यांनी हनुमान नगर येथील पालिकेच्या मालकीची ऑक्सिडेशन प्लाँटची जागा सुचवली. येथे पालिकेने नवीन एचटीपी उभारल्याने  तो जुना प्रकल्प बंद आहे. सुमारे 10 ते 12 एकर ही जागा असून त्यावर क्रीडांगण व प्रदर्शन हॉलचे आरक्षण आहे. त्यामुळे येथे नाट्यगृह उभारणे शक्य आहे. भोसले म्हणाले, आमचा भाग गुंठेवारीचा आहे. यामुळे गुंठेवारीतील भागाला नाट्यगृहासह सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास त्या भागाच्या विकासाला गती येईल.