Sat, Jun 06, 2020 13:58होमपेज › Sangli › मगरीने शाळकरी मुलाला ओढून नेले 

मगरीने शाळकरी मुलाला ओढून नेले 

Published On: May 17 2019 1:46AM | Last Updated: May 16 2019 11:42PM
कसबे डिग्रज : वार्ताहर

मौजे डिग्रज (ता. मिरज) येथे कृष्णा नदी पात्रात आंघोळ करणार्‍या बारा वर्षीय मुलाला मगरीने ओढून नेले. रात्री उशिरापर्यंत यांत्रिक बोटीच्या साहाय्याने शोधकार्य सुरू होते. मात्र, त्या मुलाचा थांगपत्ता अद्याप लागलेला नाही. आकाश मारुती जाधव (मूळ रा. निंबाळ आरएस., ता. इंडी, जि. विजापूर) असे त्या मुलाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली.

बाळासाहेब लांडे यांच्या शेतात नदी काठावर विटभट्टीवर काम करणारे मजूर राहतात. त्यापैकी मारुती कोमू जाधव (मूळ रा. निंबाळ आरएस.ता. इंडी, जि. विजापूर) हे आपल्या कुटुंबासह काम करतात. त्यांच्या दोन मुली व मुलगा आकाश आपल्या मूळ गावाहून आई-वडिलांकडे सुट्टीसाठी आले होते. गुरुवारी (दि. 16) दुपारी दीड वाजता मारुती जाधव यांची पत्नी आपल्या मुलांसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. आकाश हा जवळच आंघोळ करीत होता. यावेळी अचानक आकाशवर मगरीने हल्ला केला. मात्र, त्याच्या आईला काहीच करता आले नाही. स्वत:च्या डोळ्यादेखत मुलावर झालेल्या हल्ल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांच्या आरडाओरड्याने विटभट्टीवरील लोकांनी नदीकडे धाव घेतली. 

पोलिसपाटील सतीश पाटील यांनी तत्काळ वन विभागाशी संपर्क साधला. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. वनक्षेत्रपाल एम.व्ही.कोळी, वनरक्षक आर. एस.पाटील, जाधव, वनपाल सर्जेराव साळुंखे आदींनी यांत्रिक बोटीच्या सहाय्याने शोध सुरू केला.  यावेळी नदीपात्रात मगर मुलाला घेऊन फिरत होती. मृत मुलाला मगरीच्या जबड्यातून सोडविण्यासाठी बोटीच्या सहाय्याने प्रयत्न करण्यात आले. मात्र, त्यात अपयश आले. सहा. पोलीस निरिक्षक उदय देसाई, गुंडा पवार, सांगली ग्रामीणचे सुनिल जाधव, प्राणी मित्र पापा पाटील आदी उपस्थित होते.

या घटनेमुळे विटभट्टी कामगार, दोन्ही डिग्रज गावांबरोबरच नदीकाठावरील गावात भितीचे वातावरण आहे. गतवर्षी मे महिन्यात तुंग येथील महादेव तुकाराम मोरे या मच्छीमारावर मगरीने हल्ला केला होता. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच सुदैवाने तो बचावला. तर यापूर्वी आमनापूर भिलवडी पासून ते डिग्रज बांधार्‍यापर्यंत अनेक वेळा मगरींचे हल्ले झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत यांत्रिक बोटीच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते, मात्र मृतदेह हाती लागला नाही. शुक्रवारी सकाळी पुन्हा शोध घेण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.