होमपेज › Pune › लेखक उत्तम बंडू तुपे हलाखीच्या परिस्थितीत

लेखक उत्तम बंडू तुपे हलाखीच्या परिस्थितीत

Published On: Dec 08 2018 1:34AM | Last Updated: Dec 08 2018 1:34AM
पुणे : प्रतिनिधी

साहित्य अकादमी पुरस्कार, शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार, अण्णा भाऊ साठे पुरस्कार अशी भली मोठी पुरस्कारांची यादी. 52 पुस्तकांची ग्रंथसंपदा. विद्यापीठांकडून काही पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश. पुस्तकांवर नाटकंदेखील सादर झाली. समाज ढवळून टाकणारे लिखाण. सत्तरच्या दशकात दलित साहित्यात विपुल प्रमाणात लिखाण करून नावारूपाला आलेल्या साहित्यिकाची सध्या परवड होतेय. त्या लेखकाचं नाव उत्तम बंडू तुपे. 

उतारवयात उत्पन्नाचे साधन काहीच नसल्याने तुपे दाम्पत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा वयात शासनाने मदत करावी, अशी याचना तुपे करीत आहेत. चतुर्थश्रेणीची नोकरी करत-करत त्यांनी लिखाण केले. ‘काट्यावरची पोटं’ हे आत्मचरित्र, ‘आंदण’ आणि ‘कोबारा’ हा लघुकथा संग्रह, ‘झुलवा’, ‘भस्म’, ‘इजाळ’, ‘खाई’, ‘खुळी’, ‘चिपाड’ अशा कादंबर्‍यांसह 52 पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांच्या कथा गोरगरिबांच्या वेदनांना वाचा फोडणार्‍या झाल्या आहेत. त्यांत अठराविसे दारिद्य्राचे दर्शन आहे.

शेतकरी, कष्टकरी वर्गाच्या या वास्तवाला धरून असलेल्या कथा आहेत. अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा, स्त्रियांची दुःखे, असे ग्रामीण वातावरण तुपे यांनी रेखाटली आहेत. दलित साहित्याच्या चळवळीमधील ज्येष्ठ लेखक उत्तम बंडू तुपे सध्या मुळा रोडवरील झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या खोलीमध्ये आज ते पत्नीसह जीवन जगत आहेत. यातच आणखी भर पडली ती पक्षाघाताची. पक्षाघाताचा त्रास होऊ लागल्याने ते अंथरुणावर खिळले आहेत. 

प्रशासनाचे दुर्लक्ष  

महाराष्ट्राच्या साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य असलेले दलित साहित्यिक उत्तम बंडू तुपे यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चतुर्थश्रेणी कामगार म्हणून निवृत्त झालेल्या उत्तम बंडू तुपे यांना फक्त चार ते पाच हजार रुपये पेन्शन मिळते. याशिवाय तुपे यांनी त्यांच्या कादंबरीच्या रॉयल्टीदेखील बंद झाल्याचे सांगितले.

अशा कलावंताची परवड होता कामा नये...

बहुजन समाजामधील कल्पक व्यक्तीने हलाकीच्या परिस्थितीमध्ये आयुष्य घालविले. अशा माणसाला मदतीचा हात मिळायला हवा. झुलवा या कादंबरीच्या माध्यमातून रंगमंचावर आलेले आणि त्यानंतर ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेले नाटक या आशयाने अशा कलावंताची परवड होता कामा नये. सरकारने तुपेची गरज लक्षात घ्यायला हवी. शक्य झाल्यास मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत बोलेल. मी उत्तम बंडू तुपेना मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. ही आपली सामुदायिक जवाबदारी आहे.
-वामन केंद्रे, ज्येष्ठ नाट्यकर्मी, माजी संचालक, राष्ट्रीय नाट्य अकादमी