Mon, Jun 17, 2019 10:04होमपेज › Pune › ..तर महाआघाडीत 'स्‍वाभिमानी'ही : राजू शेट्टी(Video)

..तर महाआघाडीत 'स्‍वाभिमानी'ही : शेट्टी(Video)

Published On: Oct 12 2018 10:16PM | Last Updated: Oct 12 2018 10:19PMपुणे : प्रतिनिधी

भाजपच्या कडव्या जातीयवादी धोरणाला जसा आमचा विरोध आहे, तसाच ‘एमआयएम’च्याही धोरणाला विरोध आहे. मात्र, धर्मा-धर्मामध्ये जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा कोणताही टोकाचा विचार स्वाभिमानीला मान्य नाही. म्हणून  वादग्रस्त मुद्दे बाजूला ठेवून किमान समान कार्यक्रमावर आधारित सध्याच्या सरकारच्या विरोधात महाआघाडी करून त्यात एकत्र यायची तयारी असेल तर स्वाभिमानी त्यामध्ये सहभागी होईल, असे सूतोवाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी येथे केले. मात्र, शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि शेतीमालास दीडपट हमीभावाचा मुद्दा आम्ही कदापि सोडणार नसल्याचेही ते म्हणाले.

राज्यात निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर नवीन राजकीय आघाडी निर्माण होत असून बहुजन वंचित आघाडीच्या नावाखाली औरंगाबादमध्ये मेळावे झाले. त्यामध्ये प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम वंचितांचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणतात. शेतकरीही वंचित वर्गात येतात, या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारले असता पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 

सध्याचे सरकार किळसवाणे राजकारण करीत आहे. माणसामाणसात, जाती-जातीमध्ये द्वेष निर्माण करायचा आणि डोकी फोडायला लावायची आणि रक्ताचे गुलाल उधळून राजकारण करायचे हे या महाराष्ट्रात नवे आहे. दाभोलकरांच्या खुनाचे समर्थन करण्यासाठी १०-१० हजारांचा मोर्चा निघतो. हाच काय फुले-शाहू-आंबेडकरांचा, सुधारकांचा, विचारवंतांचा महाराष्ट्र, असे विचारण्याची वेळ आली आहे. त्याला जाणीवपूर्वक खतपाणी घातले जात आहे. असे जे काही मूलतत्त्ववादी विचाराचे लोक राजकारणात आहेत त्यांच्या विरोधामध्ये एक व्यापक महाआघाडी व्हायला हवी, अशी सर्वसामान्य जनतेची धारणा असल्याचेही ते म्हणाले.

खासदार शेट्टी पुढे म्हणाले की, राज्यात भाजप वगळता ८ ते १० राजकीय पक्षांनी एकत्र येऊन गठबंधन करण्याबाबत चर्चा सध्या सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रकाश आंबेडकर यांना गेल्याच आठवड्यात भेटलो होतो. त्यांनाही विनंती केली की, सर्वसामान्य जनतेची इच्छा असून त्याला डावलून आपण पुढे जाऊ शकत नाही.  किमान समान कार्यक्रमावर हे गठबंधन असायला हवे. छोट्या-मोठ्या पक्षांचा धोरण कार्यक्रम असून प्रत्येकाने आपलेच खरे असे म्हणून चालणार नाही. स्वाभिमानीची तीच भूमिका असून लोकसभेत मी दोन विधेयके मांडली आहेत. त्यामध्ये संपूर्ण कर्जमुक्ती आणि दीडपट हमीभावाचा समावेश असून त्याचे कायद्यात रूपांतर करण्याचे आश्‍वासन मिळाल्यास स्वाभिमानीही या महाआघाडीत सामील होईल.

राष्ट्रवादीविरोधात तुम्ही नेहमी खडे फोडत होता. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी तुमच्यासाठी मतदारसंघ सोडायची तयारी दर्शविली असल्याचे वृत्त आले असल्याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, आघाडी झाली तर- जरच्या भाषेत ते बोलले आहेत. अजून आघाडी झालेली नाही. ती झाली तर महाआघाडी होईल आणि त्यामध्ये एकच राष्ट्रवादी पक्ष असणार नाही, तर सर्व पक्ष त्यात असतील. त्यासाठीसुद्धा स्वाभिमानीचा आग्रह किमान समान कार्यक्रमाचा असेल, असेही ते म्हणाले.